Kolhapur: शिरोळ तालुक्याला वळीव पावसाने झोडपले, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:03 PM2024-04-17T17:03:46+5:302024-04-17T17:04:04+5:30

सांगली-कोल्हापूर महामार्गावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प

Rain lashed Shirol taluka Kolhapur district, relief to heat shocked residents | Kolhapur: शिरोळ तालुक्याला वळीव पावसाने झोडपले, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा 

Kolhapur: शिरोळ तालुक्याला वळीव पावसाने झोडपले, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा 

जयसिंगपूर/ शिरोळ/ कुरुंदवाड : जयसिंगपूर, शिरोळसह तालुक्यात बुधवारी सायंकाळी गारपीट व वादळी वाऱ्यासह जोरदार वळीव पावसाने हजेरी लावली. सांगली- कोल्हापूर महामार्गावर उदगाव ते रेल्वे ब्रिजपर्यंत झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

उदगावसह परिसरात घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले, तर वीटभट्टी व्यावसायिकांनाही पावसाचा फटका बसला. सुमारे तासभर जोरदार पावसामुळे शेतकरी वर्गाला मात्र दिलासा मिळाला आहे. दोन तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. कुरुंदवाड येथे एसटी आगारातील मोठे झाड डिझेल पंपानजीक असणाऱ्या शेडवर पडल्याने नुकसान झाले.

बुधवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला होता. ४ वाजेच्या सुमारास सुमारे पंधरा मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा ४:४५ वाजेनंतर गारपिटीसह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, शिरोळ येथील मुख्य मार्गावर पडलेल्या पावसामुळे दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार घडले. शिरोळ येथे आठवडी बाजारात व्यापारी व भाजी विक्रेत्यांबरोबर नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. 

उदगाव येथे झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे बसेसदेखील थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. दरम्यान, उदगाव येथे सांगली- कोल्हापूर महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या होत्या.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. वीटभट्टी व्यावसायिकांना या पावसाचा आर्थिक फटका बसला. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. कुरुंदवाड, दत्तवाड, हेरवाड, चिंचवाडसह परिसरातही चांगला पाऊस झाला.

Web Title: Rain lashed Shirol taluka Kolhapur district, relief to heat shocked residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.