बाराही महिने १० दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Published: February 23, 2017 01:15 AM2017-02-23T01:15:55+5:302017-02-23T01:15:55+5:30

धरणगाव : सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी नव्याने जलवाहिनी टाकण्याची गरज

Water supply for 12 days in 12 months | बाराही महिने १० दिवसाआड पाणीपुरवठा

बाराही महिने १० दिवसाआड पाणीपुरवठा

Next

धरणगाव : पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या पाच झोनचे एकेक झोन वाढत जाऊन ते पन्नासपर्यंत पोहोचल्याने धरणगाववासीयांना १० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ही परिस्थिती केवळ आजची नसून, बाराही महिने ही स्थिती कायम असते. यामुळे नागरिक कंटाळले आहेत. नियमित पाणीपुरवठ्यासाठी पालिकेने प्रभावी नियोजन करण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.
पूर्वीपासून शहरवासीयांच्या नशिबी असलेले पाण्याचे दुर्भिक्ष १४ कोटींची तापी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर तरी कमी होईल, असे वाटत होते. मात्र ही योजना कार्यान्वित झाल्यानंतरसुद्धा पाणी असो वा नसो ‘१० दिवसाआड’ शहराला पाणीपुरवठा होतो. याचे मुख्य कारण म्हणजे शहरातील मुख्य पाच झोनचे गल्लोगल्ली झालेले ५० उपझोन होय.
या उपझोनमुळे एका झोनला दोन दिवस पाणीपुरवठा करावा लागतो. पर्यायाने रोटेशन फिरण्यास १० दिवस लागतात. त्यामुळे शहरासाठी नव्याने जलवाहिन्या टाकण्याची नितांत गरज असून यासाठी सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
नूतन नगराध्यक्षांनी मंत्र्यांच्या सहकार्याने हा निधी मंजूर करून घेतल्यास शहराची पाणीपुरवठ्याची समस्या सुटण्यास मदत होणार     आहे.
योजना झाली, पण...
धरणगाव शहराला १४ कोटींची पाणीपुरवठा योजना १९९८ ला मंजूर झाली होती. या योजनेच्या कामाला १७-१८ वर्षे लोटली गेली.
योजना पूर्ण होऊन शहराला पाणीही मिळाले. मात्र ‘जलशुद्धीकरण’ केंद्राचे काम अद्याप रखडलेलेच आहे. तापी योजनेचे अशुद्ध पाणी शहरवासीयांना जादा झोनमुळे १० दिवसाआड मिळत आहे.
जलवाहिन्या बदलणे हा एकच पर्याय
शहरातील सर्व जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी या योजनेंतर्गत नागपूर येथील ए.डी.सी.सी. कंपनीतर्फे नवीन जलवाहिन्या टाकण्यासंदर्भात सर्व्हे करण्यात आला आहे. जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी सुमारे ३० ते ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित  आहे.
या सर्व्हेचा डीपीआर कंपनीने महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे पाठविला असून, जीवन प्राधिकरण इस्टिमेट तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविणार आहे.
हा प्रस्ताव मंजूर झाला तरच शहरातील पाणी समस्या दूर होणार आहे. यासाठी मतदारसंघाचे मंत्री गुलाबराव पाटील, शहराचे नूतन नगराध्यक्ष सलीम पटेल, उपनगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन व सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे, तरच शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत होईल. (वार्ताहर)
लोकप्रतिनिधींच्या आग्रहावरून वाढले उपझोन
४पूर्वी धरणगाव शहरात पाच झोनद्वारे पाणीपुरवठा होत असे. कालांतराने पाच झोनचे लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव उपझोन वाढत गेले अन् वाढता वाढता पन्नासवर उपझोन झाले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.
४एक झोन व त्याच्या उपझोनला पाणीपुरवठा करण्यास दोन दिवस लागत असल्याने रोटेशन फिरता फिरता १० दिवस उलटून जातात. त्यामुळे शहरवासीयांना १० दिवसाआड पाणी मिळत आहे.
४झोन वाढल्यामुळे शहरवासीयांना पाणी मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. अजून फेब्रुवारी सुरू आहे. एप्रिल-मे महिना काढायचा आहे, तेव्हा काय हाल होतील या चिंतेत नागरिक आहेत.
धरणगाव शहरातील अंतर्गत जलवाहिन्या बदलविण्यासाठी शासन दरबारी आमचे प्रयत्न सुरू आहेत.           राज्याचे विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागेल, असा आम्हाला विश्वास आहे. जेणेकरून धरणगाववासीयांना सुरळीत पाणीपुरवठा करून         देण्याचे आमचे प्रयत्न               आहेत.
-सलीम पटेल,
नगराध्यक्ष, धरणगाव

Web Title: Water supply for 12 days in 12 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.