मतदार संघ पुनर्रचनेमुळे बदलली राजकीय समीकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:26 AM2019-03-24T11:26:45+5:302019-03-24T11:28:19+5:30

२०१९ च्या लोकसभेच्या वेळीदेखील २००९ च्या पुनर्रचनेनुसार निवडणुका होत आहेत.

Political Equations That Changed Voters' Rebutment | मतदार संघ पुनर्रचनेमुळे बदलली राजकीय समीकरणे

मतदार संघ पुनर्रचनेमुळे बदलली राजकीय समीकरणे

googlenewsNext


जळगाव/रावेर/धुळे/नंदुरबार : भारत मर्यादीकरण आयोग (डी लिमिटेशन कमिशन) च्या शिफारशीनंतर २००९ मध्ये मतदार संघांची पुनर्रचना होऊन मतदार संघांमध्ये काही बदल झाले. या बदलाचे परिणाम अनेकांच्या राजकीय कारकिर्दीवर झाले तर नव्या रचनेमुळे अनेकांची अद्यापही दमछाक होत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.
एरंडोल लोकसभा मतदार संघ झाला जळगाव
जिल्ह्यातील जळगाव लोकसभा मतदार संघाचे नाव पूर्वी एरंडोल लोकसभा मतदार संघ असे होते. २००९ मध्ये भारत मर्यादीकरण आयोग (डी लिमिटेशन कमिशन) च्या शिफारशीनंतर मतदार संघांची पुनर्रचना होऊन मतदार संघांमध्ये काही बदल झाले.
जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदार संघ अनेक वर्षांपासून आहेत. दर दहा वर्षानंतर जनगणना झाल्यानंतर मतदार संघांची पुनर्रचना होणे अपेक्षित असते. त्यानुसार भारत मर्यादीकरण आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार २००९ च्या म्हणजे पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी पुनर्रचित मतदार संघांच्या रचनेनुसार निवडणुका झाल्या होत्या. २००९ नंतर २०१४ म्हणजे सोळाव्या लोकसभेच्या वेळी व त्यानंतर सतराव्या म्हणजे २०१९ च्या लोकसभेच्या वेळीदेखील २००९ च्या पुनर्रचनेनुसार निवडणुका होत आहेत.
एरंडोल ते जळगाव असे झाले बदल
पूर्वीच्या एरंडोल लोकसभा मतदार संघात एरंडोल,पारोळा-भडगाव, पाचोरा,चाळीसगाव, अमळनेर व चोपडा असे सहा विधानसभा मतदार संघ होते. पुनर्रचनेनंतर २००९ पासून एरंडोल लोकसभा मतदार संघाचे नाव जळगाव लोकसभा मतदार संघ असे झाले. या मतदार संघात जळगाव शहर, जळगाव ग्रामिण, अमळनेर, पारोळा- एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा या विधानसभा मतदार संघांचा समावेश झाला. या मतदार संघातील पूर्वीच्या पारोळा-भडगाव मतदार संघातील भडगाव तालुका हा पाचोरा तालुक्याला जोडला गेला तर या तालुक्यातील अमडदे-गिरड जि.प.गट हा एरंडोल मतदार संघात समाविष्ट झाला.असा झाला रावेर लोकसभा मतदार संघ
पूर्वीचा भुसावल लोकसभा मतदार संघाचे पहिले खासदार म्हणून काँग्रेसचे शिवराम रंगो राणे आणि आताच्या रावेर लोकसभा मतदार संघाचे पहिले खासदार म्हणून हरिभाऊ जावळे यांना मान मिळाला आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघाने सातत्याने लेवा समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. १९५२ मध्ये पूर्व खान्देश व भुसावळ लोकसभा मतदार संघ होते. भुसावळ लोकसभा मतदार संघाचे सन १९७७ मध्ये जळगाव लोकसभा मतदार संघ असे नामकरण झाले. त्यानंतर २००८ पर्यंत हा मतदार संघ अस्तित्वात राहिला. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुनर्रचित मतदार संघाचे विभाजन करण्यात आले. पूर्वीचा एरंडोल लोकसभा मतदार संघ नवीन रचनेप्रमाणे जळगाव झाला तर जळगाव लोकसभा मतदार संघाचे नाव हे रावेर लोकसभा झाले.
या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश
या मतदारसंघात चोपडा व विदर्भातील मलकापूर या दोन नवीन मतदार संघाचा समावेश करण्यात आला. यासह मुक्ताईनगर, रावेर- यावल, जामनेर व भुसावळ या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश रावेर लोकसभा मतदार संघात झाला आहे.
४० वर्षात तीन वेळा मतदार संघाची पुनर्रचना
नंदुरबार - लोकसभा निवडणुकीसाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ खान्देशातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाची गेल्या ४० वर्षात तिसऱ्यांदा पुनर्रचना करण्यात आली. १९७७ पूर्वी या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र वेगळे होते. त्यानंतर १९७७ ला पुनर्रचना होऊन त्यात नंदुरबार, नवापूर, अक्राणी, शहादा-दोंडाईचा, साक्री मतदारसंघाचा अर्धा भाग व शिरपूर मतदारसंघ असा होता. पुन्हा परिसिमन आयोगाचा आदेश क्रमांक २६ नुसार ३१ जुलै २००६ ला त्याची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेत विधानसभा मतदारसंघातील रचनाही बदलली होती. त्यात विशेषत: अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री व शिरपूर अशा सहा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र घेण्यात आले. या पुनर्रचनेत शिंदखेडा तालुक्यातील भाग वगळला गेला तर साक्री तालुक्यातील कार्यक्षेत्र वाढले.
धुळे लोकसभा मतदारसंघात असे झाले बदल
पूर्वी - या मतदारसंघात धुळे, कुसुंबा, शिंदखेडा, साक्री, सटाणा व कळवण या विधानसभा क्षेत्रांचा समावेश होता. आता - या मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, बागलाण, मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या सहा विधानसभा क्षेत्रांसह साक्री विधानसभा क्षेत्राच्या काही भागाचा समावेश आहे.
पुनर्रचनेनंतर मतदार संघ झाला खुला
धुळे - भारत निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे दर १० वर्षांनी जनगणनेनंतर लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येते. त्यानुसार धुळे लोकसभा मतदारसंघाची २००९ साली पुनर्रचना करण्यात आली. तसेच तो सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला.
पूर्वी या मतदारसंघात धुळे, कुसुंबा, शिंदखेडा, साक्री, सटाणा व कळवण या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. पुनर्रचनेनंतर आता या मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, बागलाण, मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या सहा विधानसभा क्षेत्रांसह तसेच साक्री विधानसभा क्षेत्राचा भाग यांचा समावेश आहे.
पूर्वी धुळे तालुक्यात असलेल्या कुसुंबा विधानसभा क्षेत्राचे नाव या पुनर्रचनेवेळी धुळे ग्रामीण असे करण्यात आले. पूर्वी हा मतदारसंघ अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गासाठी राखीव होता. परंतु २००९ मध्ये पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला. त्यावेळी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव सोनवणे या मतदारसंघातून निवडून आले होते.

Web Title: Political Equations That Changed Voters' Rebutment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.