रुग्णालयांवरील हल्ले, रुग्णांची हेळसांड रोखण्यासाठी जळगावात आता रुग्ण तक्रार निवारण समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 10:50 PM2018-04-08T22:50:51+5:302018-04-08T22:50:51+5:30

घोषणा

patient grievance committee in Jalgaon | रुग्णालयांवरील हल्ले, रुग्णांची हेळसांड रोखण्यासाठी जळगावात आता रुग्ण तक्रार निवारण समिती

रुग्णालयांवरील हल्ले, रुग्णांची हेळसांड रोखण्यासाठी जळगावात आता रुग्ण तक्रार निवारण समिती

Next
ठळक मुद्देरोटरी, आयएमएच्यावतीने चर्चासत्रसंवाद घडवून आरोग्यदूत बनण्याची गरज

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ८ - डॉक्टर व रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात संवादा अभावी अनेकदा हॉस्पिटलमध्ये हल्ले होणे, रुग्णांची हेळसांड किंवा ग्राहक संरक्षण कायद्यान्वये केसेस अशा घटना घडू नये म्हणून आयएमएचे नवनिर्वाचित मानद सचिव डॉ.विलास भोळे यांनी १० सदस्यीय रुग्ण तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
गणपती नगरातील रोटरी हॉलमध्ये रोटरी क्लब जळगाव आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने ८ रोजी डॉक्टर, रुग्ण व ग्राहक संरक्षण कायदा या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष डॉ. तुषार फिरके, आयएमएचे अध्यक्ष डॉ.किरण मुठे , मानद सचिव डॉ. विलास भोळे, डॉ. राजेश पाटील, प्रा. डॉ. अ‍ॅड. विजेयता सिंग, अ‍ॅड. श्रीकांत भुसारी उपस्थित होते.
संवादाद्वारे प्रश्न सुटावे
डॉ.किरण मुठे यांनी आज डॉक्टरांचे जीवन असुरक्षीत आणि रुग्ण उपचाराबाबत असमाधानी आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे डॉक्टरांनी जाणकार मित्र व्हावे व संवादाद्वारे प्रश्न सुटावे म्हणून हे चर्चासत्र आयोजित केल्याची भूमिका विषद करतांना सांगितले.
अ‍ॅड. श्रीकांत भुसारी यांनी १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा लागू झाल्याची माहिती देऊन डॉक्टर व रुग्ण यांच्यातील विविध खटल्यांची व निर्णयांची माहिती दिली. निष्काळजीपणा या मुद्यांचा प्रत्येक घटनेत वेगवेगळा अर्थ निघतो असे सांगितले.
....तर जाहिरात करण्यास डॉक्टरांना मुभा द्या
आज सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टरांविषयी नाराजीचा सूर व्यक्त होतांना दिसतो. गैरसमजातून हे प्रकार घडत असतात त्यामुळे डॉक्टरांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद कायम ठेवला पाहिजे तसेच उपचाराची पूर्ण माहिती देणारी कागदपत्रे तयार करुन सांभाळणे व रुग्णांसही दिले पाहिजे. समुपदेशनदेखील प्रभावी उपाय असून वैद्यकीय क्षेत्रातील स्पर्धांमुळे काही अंशी या क्षेत्रातही अपप्रवृत्ती असल्याची शक्यता डॉ. विलास भोळे यांनी व्यक्त केली. पोलिसांनादेखील वैद्यकीय कायद्याविषयी पूर्ण माहिती नसते. वैद्यकिय सेवा जर कायद्याने व्यवसाय असेल तर जाहिरात करण्यास डॉक्टरांना मुभा दिली पाहिजे असेही ते म्हणाले.
प्रा. डॉ. अ‍ॅड. विजेयता सिंग यांनी ग्राहक संरक्षण कायद्याविषयी सविस्तर माहिती देत यात कोणतेही शुल्क लागत नाही व वकीलांऐवजी स्वत:देखील युक्तिवाद करु शकतात. प्रत्येक घटनेत वेगवेगळा निर्णय येत असतो मात्र कायद्याचा दुरुपयोग होऊ नये असेही त्या म्हणाल्या.
संवाद घडवून आरोग्यदूत बनण्याची गरज
समाजाने घ्यावयाची काळजी याबद्दल डॉ. राजेश पाटील यांनी भूमिका मांडतांना अलीकडे ग्राहक संरक्षण कायद्यापेक्षा ३०६ हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण वाढत असून तथाकथित समाजसेवक , सामाजिक संस्था, ‘गुगल’ बाबाच्या माध्यमातून मिळालेली माहिती यामुळे डॉक्टर व रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यात वाद निर्माण होतात. खरं तर चांगल्या समाज सेवक, संस्था यांनी माणुसकी जिवंत रहावी म्हणून यांच्यात संवाद घडवून आरोग्यदूत बनण्याची गरज आहे. एकदा डॉक्टरांची निवड केल्यावर ते देव नाही पण दानव ही नाही हे समजून घेतले पाहिजे. काही शंका असेल तर आपल्या परिचीत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यातून मार्ग निघून अश्या घटना टाळू शकतात असे मत मांडले. यानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.
अशी असेल रुग्ण तक्रार निवारण समिती
या चर्चासत्राचे फलित म्हणून आयएमएचे मानद सचिव डॉ. विलास भोळे यांनी रुग्ण तक्रार निवारण समितीची घोषणा केली. या समितीत आयएमएचे अध्यक्ष , मानद सचिव, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हे तीन पदसिध्द सदस्य म्हणून तर इतर समिती सदस्य म्हणून डॉ. राजेश पाटील, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. प्रीती दोशी, अ‍ॅड. विजेयता सिंग, अ‍ॅड. श्रीकांत भुसारी, सामाजिक कार्यकर्ते आर. बी.पाटील यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

Web Title: patient grievance committee in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.