एकापेक्षा एक अप्सरा : लावणी कार्यक्रमाला महिलांची तुफान गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:06 AM2018-02-02T00:06:49+5:302018-02-02T00:07:11+5:30

महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळख असणारी लावणी मराठी मनांना किती वेड लावू शकते आणि ढोलकीच्या तालावर ठेका धरायला कशी भाग पाडते, याचे उदाहरण लोकमत सखी मंच आयोजित एकापेक्षा एक अप्सरा लावणी कार्यक्रमात पहायला मिळाले.

Women's storm surge in the Lavani program | एकापेक्षा एक अप्सरा : लावणी कार्यक्रमाला महिलांची तुफान गर्दी

एकापेक्षा एक अप्सरा : लावणी कार्यक्रमाला महिलांची तुफान गर्दी

googlenewsNext

जालना : महाराष्ट्राचे लोकनृत्य म्हणून ओळख असणारी लावणी मराठी मनांना किती वेड लावू शकते आणि ढोलकीच्या तालावर ठेका धरायला कशी भाग पाडते, याचे उदाहरण लोकमत सखी मंच आयोजित एकापेक्षा एक अप्सरा लावणी कार्यक्रमात पहायला मिळाले.
जालना येथील अंबड रोडवरील मातोश्री लॉन्सवर गुरुवारी रंगलेला हा लावणी धमाका पाहून महिला भारावल्या अन लावणीच्या तालावर मुक्तपणे थिरकल्याही. कित्येक वर्षे महाराष्ट्रातील महिलांना लावणी ही कला अनुभवता, पाहता येत नव्हती. पण आपल्या सखींनाही या कलेचा निखळ आनंद घेता यावा, यासाठी सखी मंचने पुढाकार घेऊन मागील काही वर्षापासून दरवर्षी लावणी कार्यक्रम आयोजित केला. प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला सखींचा वाढताच प्रतिसाद मिळत गेला. गुरुवारी झालेल्या कार्यक्रमालाही सखींनी तुफान गर्दी केली होती. बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा... या गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. यानंतर कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी.. ही गवळण सादर करून नृत्यांगनांनी श्रीकृष्णाची आठवण करून दिली. हळू हळू वातावरणातील गारवा वाढत गेला आणि लावणी अधिकाधिक रंजक बनत गेली. ‘दिलबरा करते तुला मुजरा..’ ही लावणी सादर करण्यासाठी साधना पुणेकर यांनी रंगमंचावर प्रवेश करताच सखींनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली. या रावजी, बसा भावजी.. ही लोकप्रिय लावणी साधना यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत सादर करून सखींची मने जिंकली.
ईचार काय हाय तुमचा.. या लावणीला सुरूवात होताच अनेक सखींनी आपल्या जागा सोडल्या आणि थेट रंगमंच गाठला. रंगमंचावर अनेक सखींनी नृत्यांगनासोबत थिरकण्याचा आनंद लुटला. सखींचा मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद नृत्यांगनांनाही नवा उत्साह देणारा ठरला. कारभारी दमानं, लाडाची गं लाडाची, कैरी पाडाची.. अशा लोकप्रिय लावण्या सखींना तालावर थिरकण्यास भाग पाडत होत्या.
निवेदक नवनाथ भोसले यांनीही गं सजणी... यासारखी लोकप्रिय गाणी गाऊन सखींचे मनोरंजन केले. सोडा सोडा राया हा नाद खुळा.., तुम्हावर केली मी मर्जी बहाल.. यासारख्या लोकप्रिय लावण्यांनी कार्यक्रमांची रंगत वाढविली.
शनिवारी नाटकाचे आयोजन
लावणीच्या धमाक्यानंतर शनिवारी (दि. ३ फेब्रुवारी) सायं. ५.३० वा. मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात चोरीचा मामला या हास्याचा खळखळाट फुलविणाºया नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केवळ सखी मंच सदस्यांसाठीच असल्यामुळे येताना २०१८ चे ओळखपत्र सोबत घेऊन यावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी दुपारी ३ वाजेपासून सखी मंच सदस्य नोंदणी करता येईल. तसेच शहरातील विविध केंद्रावर व लोकमत कार्यालय, गीता कॉम्पलेक्स, भोकरदन नाका, जालना येथे सदस्यता नोंदणी करता येईल.

Web Title: Women's storm surge in the Lavani program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.