वर्षभरात एक दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:00 AM2018-12-21T01:00:29+5:302018-12-21T01:00:40+5:30

वर्षभरात जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल १६५ अपघात झाले असून यामध्ये १७१ लोकांना प्राण गमवावे लागले आहे.

Accidental death of one per 2 days | वर्षभरात एक दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू

वर्षभरात एक दिवसाआड एकाचा अपघाती मृत्यू

Next

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वर्षभरात जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर तब्बल १६५ अपघात झाले असून यामध्ये १७१ लोकांना प्राण गमवावे लागले आहे. सरासरीनुसार जिल्ह्यात दोन दिवसाला दोन अपघात, तर दोन दिवसाला एक व्यक्ती ठार होत असल्याचे दिसून येते. खराब रस्ते, नियमांचे पालन न करणे, मद्यपान, निष्काळजीपणा, अति घाई हे मुद्दे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. वर्षभरात एक दिवसाआड एकाचा मृत्यू होत आहे.
जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस महामार्गावरील अपघातांची संख्या वाढत चालली आहे. विस्कळीत वाहतूक व्यवस्था, नियमांचे पालन न करणे यासारखी कारणे अपघातास निमंत्रण देत आहेत. जिल्ह्यातून पाच राज्य महामार्ग जातात. यामध्ये औरंगाबाद- जालना, जालना -नांदेड, जालना - देऊळगावराजा, जालना-सिंदखेड राजा, जालना - अंबड यांचा समावेश आहे. यातील जालना-अंबड महामार्ग खुपच अरूंद आहे. त्यातच या मार्गावरून ट्रकसारख्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावर कोंडीसह अपघात जास्त होतात. याच मार्गावर जास्त अपघाताची नोंद असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. जिल्हा पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून वेळोवेळी रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते.
या माध्यमातून नियमांचे पालनासंदर्भात आवाहन केले जाते. तसेच मार्गदर्शनही केले जाते. परंतु प्रशासनाकडूनही कागदोपत्रीच घोडे नाचविले जात असल्याने वाहनधारकांपर्यंत जनजागृती ख-या अर्थाने पोहचत नाही. याचा परिणामही अपघातांवर होत आहे. ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’, यासारखे फलक सर्वत्र दिसतात.
अंबड रोडवर सर्वाधिक अपघात
गेल्या अनेक वर्षांपासून चौपदरीकरण न झाल्यामुळे अंबड रस्त्यावर दररोज छोटे मोठे अपघात होतात. रस्त्यावरुन दररोज हजारो वाहने धावतात. त्यातच दुहेरी वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपले प्राणही गमावावे लागले आहे. काही महिन्यापूर्वीच या रस्त्याच्या चौपदरी करणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

Web Title: Accidental death of one per 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.