सेरेंडिपिटीचा ‘शोध’ गोव्याला लागला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 09:22 PM2018-12-21T21:22:17+5:302018-12-21T21:45:23+5:30

गेला आठवडाभर गोव्यात सेरेंडिपिटी महोत्सव चालू आहे.

Did the 'Search' of Serendipity to Goa? | सेरेंडिपिटीचा ‘शोध’ गोव्याला लागला का?

सेरेंडिपिटीचा ‘शोध’ गोव्याला लागला का?

Next

- राजू नायक

गेला आठवडाभर गोव्यात सेरेंडिपिटी महोत्सव चालू आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असा दिमाखदार कला महोत्सव गोवा पहिल्यांदाच अनुभवतो आहे. त्यात चित्रकलेपासून, नाटक, सिनेमा, शिल्प, नृत्य असे सारे प्रकार सामावलेले आहेत. जगभरातील कलाकार आले आहेत. विविध ठिकाणच्या कार्यक्रमांना गर्दी उडते आहे. 

सेरेंडिपिटी म्हणजे कलेच्या तत्त्वांचा शोध. नवीन दृष्टिकोनातून, एका अनामिक ओढीने घेतलेला शोध. कलेचा नवा शोध असाही अर्थ आपण घेऊ शकतो. त्यादृष्टीने गोव्याला सेरेंडिपिटीचा ‘शोध’ लागला का, याचा आपल्याला तपास करायचा आहे. 

मी एका कलाकाराला विचारलेही, एवढा मोठा खर्च, दिमाख, नवे प्रयोग एवढा उपक्रम असूनही तुम्हाला खरोखरीचा गोवा त्यात दिसला काय? तो म्हणाला नाही म्हणजे, वृत्तपत्रांनी, प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आहे, लोक गर्दी करताहेत. परंतु त्याला ‘गोव्याचा सहभाग’ म्हणता येईल का?

गोव्यात इफ्फी होतो. पहिली काही वर्षे गोव्याचे लोक कमी दिसायचे. परंतु आता 14 वर्षानंतर गोवा त्यात दिसतो. म्हणजे स्थानिक चित्रपट निर्माण होतात, गोव्याचे कलाकार चित्रपटांच्या विचार प्रक्रियेत सहभागी होतात, साधक-बाधक चर्चा होते. तसा उत्स्फूर्त प्रतिसाद सेरेंडिपिटीला नाही. 

त्याचे एक कारण, सेरेंडिपिटीचे संपूर्ण आयोजन दिल्लीतून होते. सारी टीम दिल्लीस्थित. ते सारे दिल्लीहून येतात- स्वयंसेवकांपासून ते छायाचित्रकारांपर्यंत.. त्यामुळे गोव्याची भूमिका केवळ प्रेक्षकाची राहते. काही चित्रकार तेवढे कला प्रदर्शनात आपली चित्रे-शिल्पे मांडतात. चित्रकार सुबोध केरकर यांच्या मते, या वर्षी सेरेंडिपिटीमध्ये स्थानिक चित्रकारांना वेगळे दालन दिलेले आहे आणि बहुतेकांची चित्रे विकलीही गेली. या महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळाले. परंतु ते असेही म्हणतात की हा महोत्सव ‘उच्चभ्रू’ बनला आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्यापासून दूर राहातो. ही उणीव भरून काढण्यासाठी महोत्सव खेडेगावांमध्येही न्यावा व लोकांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी पावले उचलावी.

सेरेंडिपिटीमुळे पणजी राजधानीत कलेचे वेगवेगळे नमुने व फॉर्म लोकांना पाहायला मिळतात. परंतु शेवटी ही ‘कला’ श्रीमंत व उच्चभ्रू लोकांपुरतीच मर्यादित राहाते यात तथ्य आहे. या वर्षी महिलांचे व समलैंगिक घटकांचे प्रश्न, कलेतील वैविध्य, प्रामाणिकपणा असे विषय घेतले आहेत. दक्षिण आशियातील कलेला प्रोत्साहन देण्याचा तर या महोत्सवाचा प्रमुख उद्देश राहिला आहे. आयोजक या महोत्सवासाठी गोवा का निवडतात? कारण, गोवा हे कलेचे माहेरघर आहे असे त्यांना वाटते. गोव्यात जगभरचे लोक येतात. येथे कलेची कदर होते व समाज खराच प्रगल्भ आणि बुद्धिमान आहे असे आयोजकांचे म्हणणे आहे. एक गोष्ट खरी आहे, कोणताही प्रयोग गोव्यात चांगल्या प्रकारे स्वीकारला जातो. येथे कलेला विधायक प्रतिसाद मिळतो. परंतु प्रश्न आहेय तो असे नवे प्रयोग व कलेतील तत्त्वे शहरी प्रेक्षकांपर्यंतच आपण नेणार आहोत काय? जोपर्यंत ही कला ग्रामीण भागात जाणार नाही, स्थानिकांना सहभागी करून घेणार नाही तोपर्यंत सरकारही चांगल्या प्रकारे त्यात सहभागी होणार नाही. गेली तीन वर्षे सेरेंडिपिटीमध्ये गोवा सरकारचा सहभाग नाममात्र राहिला आहे. वास्तविक सेरेंडिपिटीने गोव्याला कायमचे स्थान बनवावे, अशी अपेक्षा जेव्हा सरकार बाळगते तेव्हा वर्षभर त्यासाठी जागृतीचे कार्यक्रम चालले पाहिजेत. या वर्षी स्थानिक चित्रकार व अपंग, मुले यांना सामावून घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न राहिला तसा ग्रामीण परंपरागत कारागीर, पारंपरिक कलाकार, स्थानिक कलांचे विविध प्रकार यांनाही सहभागी करून घेणे शक्य आहे. वर्षभर तसा ‘शोध’ चालला पाहिजे. हा महोत्सव केवळ दरवर्षी गोव्यात होऊन चालणार नाही, तो गोव्यात ‘रुजला’ पाहिजे, तरच त्याचे महत्त्व वाढेल, संवर्धन होईल. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

Web Title: Did the 'Search' of Serendipity to Goa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.