बाबूश मोन्सेरातविरुद्ध भाजपमध्ये संताप! कार्यकर्ते रागावले, नेत्यांची सावध भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2024 10:42 AM2024-01-14T10:42:07+5:302024-01-14T10:42:32+5:30

दुसरीकडे भाजपाच्या काही नेत्यांनी मात्र तूर्त थोडीशी नरमाईची व सावध भूमिका घेतली आहे.

anger in bjp against babush monserrate activists angry | बाबूश मोन्सेरातविरुद्ध भाजपमध्ये संताप! कार्यकर्ते रागावले, नेत्यांची सावध भूमिका

बाबूश मोन्सेरातविरुद्ध भाजपमध्ये संताप! कार्यकर्ते रागावले, नेत्यांची सावध भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी पणजीची वाट लावली, अशा शब्दांत पर्रीकर यांची निर्भत्सना मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कार्यकर्ते व भाजपाचे काही पदाधिकारी सोशल मीडियावरून बाबूशविरुद्ध आपला राग व्यक्त करू लागले आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या काही नेत्यांनी मात्र तूर्त थोडीशी नरमाईची व सावध भूमिका घेतली आहे.

पर्रीकर यांनी पणजीचा काहीच विकास केला नाही. आपण जिंकलो तेव्हाच पणजीत भाजपा जिंकला. बाकी पर्रीकर हे स्वतः एकटेच जिंकायचे, ते भाजपाचा विचार करत नव्हते, असे मोन्सेरात यांनी म्हटले होते. त्यावर दोन-तीन दिवस भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी काहीच प्रतिक्रिया न देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, लोकांमध्ये व भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये राग वाढल्यानंतर नेतेही काल व्यक्त झाले. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून बाबूश मोन्सेरात यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

पर्रीकरांच्या नावाचा वापर नको

स्व. मनोहर पर्रीकर हे खूप मोठे नेते होते. त्यांनी गोव्यासाठी, पणजीसाठी व देशासाठीही खूप काम केले. ते केवळ आमदार म्हणून राहिले नाही तर देशाचे संरक्षण मंत्री व गोव्याचे मुख्यमंत्रीही झाले. गोव्यात भाजपा वाढला यात पर्रीकर, श्रीपाद नाईक व अन्य नेत्यांचे खूप मोठे योगदान आहे. पर्रीकर यांच्या नावाचा वापर कुणी राजकारणासाठी करू नये. मंत्र्यांनीही करू नये व इतरांनीही करू नये. कारण पर्रीकर हे केवळ कुणा एका व्यक्त्तीचे म्हणून राहिले नव्हते तर र ते सर्वांचेच झाले होते. एकमेकांविरुद्ध राजकारण करताना पर्रीकरांचे नाव वापरू नये, असे खासदार सदानंद तानावडे पत्रकारांशी बोलताना काल म्हणाले. बाबूश यांनी केलेले विधान हे त्यांचे व्यक्तिगत आहे,
असेही तानावडे म्हणाले.

आताच राजीनामा द्या

मोन्सेरात यांचा आम्ही निषेध करतो. भाई हयात नाहीत म्हणून त्यांच्यावर आरोप होत आहेत. मात्र, हे आम्ही ते खपवून घेणार नाही. बाबूश यांनी २०२७ पर्यंत वाट पाहू नये, आताच राजीनामा द्यावा मग पर्रीकरप्रेमी त्यांना त्यांची जागा दाखवतील, अशा कडक शब्दांत भाजपाच्या माजी महिला मोर्चा प्रमुख शीतल नाईक यांनी मोन्सेरात यांच्या टीकेचा समाचार घेतला.

मनोहर पर्रीकर हे आमचे मोठे नेते होते. त्यांनी पणजीसह गोवा व देशात केलेला विकास आम्ही कुणीच विसरू शकत नाही. त्यांच्या नावाचा वापर कुणी क्षुल्लक राजकारणासाठी करू नये. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
 

Web Title: anger in bjp against babush monserrate activists angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.