‘नाथा’ची फेसाटी ‘बाळा’च्या खांद्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:12 AM2018-08-06T00:12:59+5:302018-08-06T00:13:07+5:30

विक्रेत्यांशी थेट संपर्क साधून पुस्तकविक्रीचे जाळे विणण्याच्या जमान्यात, गावोगावी डोक्या-खांद्यावर पुस्तके नेत पायपीट करणारा बाळासाहेब घोंगडेंसारखा प्रकाशक दुर्मीळच म्हणायला हवा.

'Natha' FAST 'baby' shoulder! | ‘नाथा’ची फेसाटी ‘बाळा’च्या खांद्यावर!

‘नाथा’ची फेसाटी ‘बाळा’च्या खांद्यावर!

Next

- संजय वाघ
विक्रेत्यांशी थेट संपर्क साधून पुस्तकविक्रीचे जाळे विणण्याच्या जमान्यात, गावोगावी डोक्या-खांद्यावर पुस्तके नेत पायपीट करणारा बाळासाहेब घोंगडेंसारखा प्रकाशक दुर्मीळच म्हणायला हवा. चांगला लेखक प्रकाशकाला बळ देतो तर चांगला प्रकाशक लेखकाला संधी देतो. साहित्य व्यवहारात हे नाते खूप महत्त्वाचे आहे. काही जण व्यवहाराच्या पलीकडे जाऊन या नात्याकडे पाहतात. हे नाते जपतात. असेच काहीसे सध्या युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे आणि प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांच्याबद्दल म्हणता येईल.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात कुडाच्या घरात राहणारा नवनाथ गोरे या युवकाच्या ‘फेसाटी’ या कादंबरीला सन २०१८चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर होताच एका रात्रीत तो उजेडात आला. जगण्यासाठी आणि शिक्षणासाठी मेंढ्या वळणे, गवंड्याच्या हाताखाली बिगारी, एटीएम सेंटरवर सिक्युरिटी गार्ड अशा विविध भूमिका पार पाडत नवनाथने एम.ए., बी.एड.पर्यंतचे शिक्षण मित्र व मार्गदर्शकांच्या साहाय्याने पूर्ण केले. मित्राच्या सल्ल्यानेच नवनाथने शिक्षणापर्यंतचा प्रवास कागदावर साकारला. ते लिखाण व्यासंगी समीक्षक प्रा. डॉ.रणधीर शिंदे यांना दाखविले. त्यांच्या मार्गदर्शक सूचनेनंतर दुष्काळग्रस्त भागातील पशुपालक समाजाच्या जीवनातील जळजळीत सत्य सुंबरानच्या आख्यानरूपात ‘फेसाटी’ बनून वाचकांसमोर आणले. सुरुवातीला काहीशा दुर्लक्षित असलेल्या ‘फेसाटी’ची डॉ. राहुल पाटील व डॉ. आशुतोष पाटील या समीक्षकांनी उचित दखल घेतल्याने पुन्हा ती चर्चेत आली. नवोदितांचे साहित्य गांभीर्याने न वाचता ते नाकारल्याची आजवर अनेक उदाहरणे आहेत. त्या साहित्यकृतीला यश मिळाल्यानंतर मान्यवर प्रकाशक त्या लेखकाकडे आगामी आवृत्त्या व अन्य लेखन प्रकाशित करण्यासाठी पाठपुरावा करतात. तसा अनुभव नवनाथच्याही वाट्याला आला; परंतु स्वामित्वधनाच्या मोठमोठ्या आकड्यांना नवनाथने धुडकावून लावत मित्र व पाठीराखा असलेल्या अक्षरवाङ्मय प्रकाशनच्या घोंगडे यांना पुढील आवृत्त्यांचे अधिकार दिले. घोंगडे यांनी नव्या रूपात बाजारात आणलेल्या ‘फेसाटी’चा गठ्ठा खांद्यावर घेऊन महाराष्टÑभर पायपीट सुरू केली आहे. केवळ स्वत:चीच नव्हे, तर अन्य प्रकाशकांची पुस्तकेही ते गावोगावी नेतात. त्यांच्या जिद्दीचे, साहित्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचे व अभिनवतेचे सर्वत्र कौतुक होत असल्याने ‘फेसाटी’ची दुसरी आवृत्ती अवघ्या चार दिवसात संपली. डॉ. दत्ता घोलप यांच्यासारखे मार्गदर्शक मित्र त्यांचे नीतिधैर्य उंचावत आले आहेत. त्यामुळेच कसदार साहित्यनिर्मिती करणाऱ्यांचा शोध घेऊन ते आपल्या परीने ‘अक्षरपेरणी’ करीत आहेत. प्रकाशन क्षेत्रात काळाची पावले ओळखून जे प्रवाहासोबत चालत राहिले, ते स्थिरस्थावर झालेत. त्यांनी मात्र नवोदितांना नाउमेद करण्यापलीकडे काहीही दिले नाही. अशा वातावरणात बाळासाहेब घोंगडे, सुशील धसकटे व घनश्याम पाटील आदी लेखक /प्रकाशक आजही पाय घट्ट रोवून उभे आहेत.

Web Title: 'Natha' FAST 'baby' shoulder!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.