रशियातील गूढ राजकीय हत्त्या

By Admin | Published: March 6, 2015 11:29 PM2015-03-06T23:29:36+5:302015-03-06T23:29:36+5:30

आपल्या विरोधकांना ठार करण्याची पद्धत नवी नाही आणि यातल्या बऱ्याच प्रकरणांमध्ये खुनी शेवटपर्यंत सापडत नाही व खुनाचे गूढ काही उकलत नाही.

Intriguing political assassinations in Russia | रशियातील गूढ राजकीय हत्त्या

रशियातील गूढ राजकीय हत्त्या

googlenewsNext

आपल्या विरोधकांना ठार करण्याची पद्धत नवी नाही आणि यातल्या बऱ्याच प्रकरणांमध्ये खुनी शेवटपर्यंत सापडत नाही व खुनाचे गूढ काही उकलत नाही. अशीच काहीशी स्थिती रशियातले पुतीनविरोधी नेते बोरिस नेमत्सोव्ह यांच्या हत्त्येबाबत निर्माण झाली आहे. नेमत्सोव्ह एका महिलेसोबत रात्रीचे जेवण घेऊन रेड स्क्वेअर चौकातून पायी जात असता, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या व त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोळ्या घालताच हल्लेखोर वेगाने पळून गेले. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा अंदाज पोलीस व्यक्त करीत आहेत. गेली दोन दशके नेमत्सोव्ह रशियाच्या राजकारणात सक्रिय होते. ब्लादिमीर पुतीन यांचे कडवे टीकाकार म्हणून ते ओळखले जात. येल्स्तिन यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी ऊर्जा मंत्री आणि उपपंतप्रधान म्हणूनही काम केले होते. अनेक दिवस त्यांना धमक्या येत होत्या.
रशियात सध्या मोठ्या प्रमाणावरची राजकीय अस्वस्थतता आहे. पुतीन यांना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागत आहे. एका बाजूने युक्रेनच्या प्रश्नावरून पश्चिम युरोपातले देश आणि अमेरिका यांचा विरोध तर दुसऱ्या बाजूने देशांतर्गत विरोधकांच्या वाढत्या कारवाया आणि त्यांना मिळणारे वाढते जनसमर्थन या दुहेरी संकटात पुतीन सापडले आहेत. नेमत्सोव्ह यांच्या खुनाला या वातावरणाची पार्श्वभूमी आहे. आपल्याकडच्या राजकीय दंगलीत जरी या प्रकरणाकडे फारसे लक्ष गेलेले नसले तरी ही हत्त्या आणि तिच्याशी जोडलेल्या अनेक मुद्द्यांवर पश्चिमेतल्या तसेच रशियातल्या प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. नेमत्सोव्ह जिवंत असताना पुतीन यांना जितके त्रासदायक होते, त्यापेक्षाही त्यांच्या मृत्यूनंतर ते पुतीन यांना अधिक त्रासदायक ठरतील अशी चिन्हे आहेत.
रॉजर बॉयस यांचा लंडनच्या द टाइम्समधला लेख ‘दि आॅस्ट्रेलियन’ने पुनर्मुद्रित केला आहे. मॉस्कोमधल्या या खुनाने पुतीन यांच्या हुकूमशाहीला हादरा बसेल असे सांगून बॉयस म्हणतात की, हा खून पुतीन यांनी घडवून आणलेला नसला तरी या खुनामुळे त्यांच्यासमोर गंभीर अडचणी निर्माण होणार आहेत. पुतीन यांच्या काळात क्रेमलिनने अनेक अनिष्ट पद्धतींचा वापर केला असून, चेचन्या, युक्रेन यासारख्या भागांमध्ये त्यांनी अनेक निर्घृण प्रकार घडवून आणले आहेत. बॉयस पुढे आपल्या तर्कात म्हणतात की, पुतीन यांच्या संरक्षणामुळे प्रचंड ताकद वाढलेल्या ऊर्जा, बँकिंग यासारख्या क्षेत्रातल्या बलाढ्य लोकांचा या हत्त्येत हात असू शकतोे व पुतीन यांचे कवच असल्याने त्यांचा माग लागणे सहजशक्य नाही. रशियातली तास ही सरकारी वृत्तसंस्था आपले युरोपियन युनियनमधले प्रतिनिधी व्लादिमीर चीझ्होव यांचा हवाला देऊन म्हणते की, या हत्त्येमुळे पश्चिमेतल्या देशांमध्ये निराधार अफवा आणि अंदाज यांचे पेव फुटले आहे व उगाच रशियातल्या सत्ताधाऱ्यांवर संशय घेतला जातो आहे.
मला पुतीन मारून टाकतील अशी भीती नेमत्सोव्ह यांनी व्यक्त केली होती, असे ‘डेली एक्स्प्रेस’ या इंग्लंडमधल्या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले असून, मिखाईल कास्यानोव्ह या नेमत्सोव्ह यांच्या मित्राच्या हवाल्याने ते असेही सांगते की, युक्रेनबाबतची त्यांची भूमिका पुतीन यांना मान्य नव्हती. लंडनच्या ‘गार्डियन’ने या हत्त्येच्या संदर्भात होणाऱ्या चर्चेमध्ये सत्य कुठेतरी लपून राहते आहे असे ध्वनित करणारा वृत्तांत दिला आहे. सत्य लपवण्याच्या हेतूने या घटनेबद्दल अनेक अफवा मुद्दाम उठवल्या गेल्या आहेत का अशी चर्चाही यात केली आहे. लंडनच्याच ‘द टाइम्स’ने बोरिस नेमत्सोव्ह यांच्या मुलीची मुलाखत प्रसिद्ध केली असून, त्यात तिने आपल्या वडिलांचा राजकीय कारणांसाठी खून झाला असल्याचा स्पष्ट आरोप करताना, रशियातील विद्यमान सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखविले अहे.
चीनच्या ‘पीपल्स डेली’ने, या हत्त्येबाबत रशियन सत्ताधाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दोषाचा इन्कार ठळकपणे प्रसिद्ध केला आहे. ‘अ‍ॅन्टी वॉर डॉट कॉम’ या ब्लॉगवर जस्टीन रमोन्डो यांचा जो लेख प्रसिद्ध झाला आहे, त्यात ते म्हणतात की, नेमत्सोव्ह यांनी युक्रेनच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना दिलेल्या खुल्या पाठिंब्यांचाही या घटनेशी संबंध असू शकेल. ‘मॉस्को टाइम्स’ने असे सांगितले आहे की, युक्रेनमधल्या रशियाच्या लष्करी हस्तक्षेपाबाबत एक सविस्तर अहवाल नेमत्सोव्ह तयार करीत होते व तो अहवाल अडचणीचा ठरण्याची शक्यता लक्षात घेता त्याचाही या हत्त्येशी संबंध असू शकतो. आता हा अहवाल प्रकाशित करण्याचा त्यांच्या मित्रांचा इरादा आहे. प्रावदा या रशियन वृत्तसंस्थेने आपल्या वृत्तात नेमत्सोव्ह यांच्या हत्त्येबद्दल इतक्या विविध शक्यता का वर्तवल्या जात आहेत याचे विश्लेषण केले आहे. त्यात रशियातल्या सोब्सेदनिक या पत्रात १० फेब्रुवारीला नेमत्सोव्ह आणि त्यांची ८७ वर्षांची आई या दोघांनीही पुतीन आपली हत्त्या करतील अशी भीती व्यक्त केली होती, याकडे लक्ष वेधले आहे. इझ्वेस्तिया या दुसऱ्या पत्रात या खुनामागे युक्रेनचा विषय आणि त्या विषयाच्या आधारे रशियात राजकीय विरोध संघटित करण्यात नेमत्सोव्ह यांना आलेले अपयश आणि त्यामुळे त्यांच्यावर नाराज झालेले युक्रेनियन सत्ताधारी यांच्याकडे रोख ठेवला आहे. एकूणच नेमत्सोव्ह यांच्या राजकीय खुनानंतर इतरत्र होते त्याप्रमाणेच अफवा आणि चर्चांचा प्रचंड मोठा धुरळा उडालेला प्रसारमाध्यमांमधून वाचायला मिळतो आहे.
- प्रा़ दिलीप फडके

Web Title: Intriguing political assassinations in Russia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.