भाष्य - निकाल अजून बाकी आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:50 AM2017-09-11T00:50:36+5:302017-09-11T00:51:17+5:30

मुंबईला हादरवणाऱ्या १९९३च्या बॉम्बस्फोटाचा दुसऱ्या टप्प्याचा निकाल गुरूवारी लागला़ तब्बल २५ वर्षांनी याप्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेप, तर दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली़ तज्ज्ञांच्या मते हा निकाल म्हणजे, बॉम्बस्फोट पीडितांच्या जखमांवर मारलेली फुंकर आहे. 

Annotation - The results are still pending | भाष्य - निकाल अजून बाकी आहे

भाष्य - निकाल अजून बाकी आहे

Next

मुंबईला हादरवणाऱ्या १९९३च्या बॉम्बस्फोटाचा दुसऱ्या टप्प्याचा निकाल गुरूवारी लागला़ तब्बल २५ वर्षांनी याप्रकरणातील दोन आरोपींना जन्मठेप, तर दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली़ तज्ज्ञांच्या मते हा निकाल म्हणजे, बॉम्बस्फोट पीडितांच्या जखमांवर मारलेली फुंकर आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत शिक्षा झालेले आरोपी हे या बॉम्बस्फोटातील मोहरे होते़ बॉम्बस्फोटाचा कट रचणारे, त्यासाठी पैसा गोळा करणारे व याची पूर्ण तयारी करणारे मुख्य आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत़ महत्त्वाचे म्हणजे या आरोपींचा घरचा पत्ता, मालमत्ता, संपर्क क्रमांक याची इत्थंभूत माहिती तपास यंत्रणांकडे आहे़ तरीही हे आरोपी मोकाटच आहेत़ याची कारणे सर्वसामान्यांना कळू न देण्याची काळजीही घेतली जाते़ हा बॉम्बस्फोट होऊन एक पिढी तरूण झाली़ हा खटलादेखील इतका प्रसिद्ध आहे, की शालेय विद्यार्थ्यांनादेखील यातील आरोपींची थोडी फार माहिती आहे़ घटनेची झळ त्यालाच कळते जो त्यात पोळला जातो. त्यामुळे तपास करणारे, खटला हाकणारे व निकाल देणारे कितीही शांतपणे यासर्व गोष्टी हाताळत असेल तरी पीडितांना न्याय मिळतोच असे नाही़ शिक्षेचे प्रावधान हे पीडितांना दिलासा देणारे नसते़ निवाडा होतो ते कृत्याला शिक्षा देण्यासाठी़ परिणामी शिक्षा सर्व आरोपींना वेळेत झाली, तर न्याय झाला असे म्हणावे लागेल़ मात्र तीन दशके होत आली तरी या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी मोकाटच आहेत़ या आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा खटला सुरू आहे, हे कायदेशीरदृष्ट्या सत्य आहे़ या बॉम्बस्फोटातनंतर मुंबईवर अनेक हल्ले झाले़ पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला अवघ्या वर्षभरात फाशीची शिक्षा झाली, उच्च व सर्वोच्च न्यायालयात दोन वर्षांच्या कालावधीत या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले़ त्यानंतर सहा महिन्यांत त्याला फासावर लटकवण्यात आले़ त्यावेळी तपास यंत्रणा व कायदे तज्ज्ञांनी स्वत:ची पाठ लाल होईपर्यंत थोपटून घेतली़ मात्र याच तपास यंत्रणेला अजून दाऊद, टायगर मेमन सापडत नाहीत़ तेव्हा या आरोपींना शिक्षा झाल्यावरच या खटल्याला पूर्णविराम मिळेल.

Web Title: Annotation - The results are still pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.