राज्यात एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:01 AM2018-02-17T00:01:01+5:302018-02-17T00:01:16+5:30

महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

Objective of creating one lakh jobs in the state | राज्यात एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

राज्यात एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देसुभाष देसाई : पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एनर्जी कॉन्क्लेव्ह २०१८’मध्ये प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण जाहीर केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या (पीईएस) अभियांत्रिकी महाविद्यालयात चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज आणि अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)च्या सहकार्याने चौथ्या ‘एनर्जी कॉन्क्लेव्ह २०१८’चे आयोजन केले आहे. या कॉन्क्लेव्हला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर ‘पीईएस’चे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष प्रकाश कोकीळ, डॉ. बी.एन. चौधरी, राहुल देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी देसाई म्हणाले की, सध्या राज्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातून प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे केंद्र सरकारने २०३० पर्यंत इलेक्ट्रिक व्हेईकल नेशन घडविण्याचा निर्धार केला आहे. या धोरणाची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. राज्यात नोंदणी झालेल्या पहिल्या एक लाख इलेक्ट्रिक वाहनांसाठी खाजगी वाहतूक आणि वाहतूक खरेदीदारांना धोरणाच्या कालावधीत अंतिम वापरकर्ता अनुदान देण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, सीएआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनीही मनोगत व्यक्त केले. परिषदेसाठी आयआयटीचे प्रोफेसर के. मुन्शी, इलेक्ट्रिक कारचे संस्थापक डॉ. रुशेन चेहल, मिताली मिश्रा आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन समन्वयक राहुल देशपांडे यांनी केले.
आॅरिक सिटी भारतात सर्वोत्कृष्ट असेल
मराठवाड्यात अधिकाधिक चांगले उद्योग येण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. औरंगाबादेत उभारण्यात येत असलेली आॅरिक सिटी ही भारतातील सर्वोत्कृष्ट उद्योगनगरी असेल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.

Web Title: Objective of creating one lakh jobs in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.