घर सांभाळण्यासाठी थांबलेल्या अल्पवयीन मुलानेच नातेवाईकाचे दागिने पळविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 06:34 PM2018-11-14T18:34:49+5:302018-11-14T18:36:17+5:30

घर सांभाळण्यासाठी थांबलेल्या १७ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाने नातेवाईकाच्या घरातून ११ तोळ्याचे दागिने लंपास केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.

Minor boy, who had stopped to take care of the house, also looted relatives jewelry | घर सांभाळण्यासाठी थांबलेल्या अल्पवयीन मुलानेच नातेवाईकाचे दागिने पळविले 

घर सांभाळण्यासाठी थांबलेल्या अल्पवयीन मुलानेच नातेवाईकाचे दागिने पळविले 

googlenewsNext

औरंगाबाद : घर सांभाळण्यासाठी थांबलेल्या १७ वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाने नातेवाईकाच्या घरातून ११ तोळ्याचे दागिने लंपास केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. सिडको पोलिसांनी त्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचे दागिने जप्त केले. 

याविषयी अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडकोतील रहिवासी सुरजदास वैष्णव हे सिडको एन-६ येथे पत्नी, दोन मुले आणि वडिलासह राहतात.  सिडकोतच राहणाऱ्या त्यांच्या मावसबहिणीचे  ६ नोव्हेंबर रोजी सकाळी  निधन झाल्याचे कळताच ते  लगेच तेथे गेले.  त्यानंतर काही वेळाने  सिडको एन-६ येथे गेले. दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास  पत्नी , दोन्ही मुले आणि वृद्ध वडिलासह नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी १७ वर्षीय नातेवाईकाला  घर सांभाळण्यासाठी घरी ठेवले, घराच्या चाव्याही त्याच्याकडे दिल्या. 

काहीवेळानंतर त्यानेही मृताचे अंतिम दर्शन घेण्याची इच्छा दर्शवली. त्यावेळी वैष्णव यांना फोन करून तोही अंत्यदर्शनासाठी गेला. सुमारे  चार वाजेच्या सुमारास तक्रारदार यांची पत्नी,दोन्ही मुले हे घरी गेले तेव्हा त्यांना कोणीतरी बनावट चावीने घराचे लोखंडी चॅनल गेटसह मुख्य दार उघडून कपाटातील सुमारे ११ तोळ्याचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याचे समजले. 

याप्रकरणी रात्री उशीरा सिडको ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी ,उपनिरीक्षक भरत पाचोळे, पूनम पाटील, कर्मचारी  नरसिंग पवार,राजेश बनकर, प्रकाश डोंगरे,सुरेश भिसे, स्वप्नील रत्नपारखी, किशोर गाडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. त्यावेळी त्यांनी घरी थांबलेल्या नातेवाईकावर संशय व्यक्त केला तेव्हा तक्रारदार यांना तो मान्यच नव्हता. 

कर्ज असल्याने केली चोरी 
यामुळे घटनेनंतर काही दिवस पोलिसांनी गुप्तपणे तपास करून माहिती घेतली असता संशयित आरोपी हा अल्पवयीन असून तो व्यसनी आहे. त्याच्यावर मित्रकंपनीचे २६ हजार रुपये कर्ज झाले आहे. कर्जाची परतफेड करावी, याकरीता त्याचे मित्र त्याच्याकडे तगादा लावत असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपुस केली असता सुरवातीला उडवा-उडवीची उत्तरे तो देऊ लागला.नंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत त्याने ते दागिने लंपास केल्याचे सांगितले. काही दिवस स्वत:च्या बॅगेत लपवून ठेवलेले दागिने नंतर त्याने मित्राच्या घरी ठेवले होते. हे दागिने पोलिसांनी जप्त केले.

Web Title: Minor boy, who had stopped to take care of the house, also looted relatives jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.