Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणुकीत मंडपवाल्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 07:44 PM2019-03-27T19:44:14+5:302019-03-27T19:44:58+5:30

राज्यातील अनेक शासकीय कामांत शहरातील व्यावसायिक व्यस्त 

Lok Sabha Election 2019: pavilion owners are benefit in Lok Sabha elections | Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणुकीत मंडपवाल्यांची चांदी

Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणुकीत मंडपवाल्यांची चांदी

googlenewsNext

औरंगाबाद : लोकसभेची निवडणूक जाहीर होताच शहरातील मंडपवाल्यांना हंगामी रोजगार मिळाला आहे. येथील ६ मंडप व्यावसायिकांना जिल्ह्यातील व राज्यातील १० पेक्षा अधिक  मतदारसंघांत शासकीय कामे मिळाली आहेत. या माध्यमातून सुमारे १४ हजार लोकांना काम मिळाले आहे. निवडणुकीच्या काळामुळे राज्यभरात कोट्यवधींची कामे मिळत असल्याने मंडपवाल्यांची चांदी होत आहे. 

निवडणुकीच्या काळात शासनाच्या वतीने मंडप व अन्य साहित्यासाठी टेंडर काढण्यात येतात. औरंगाबादेतील ६ मंडप व्यावसायिकांना यात टेंडर मिळाले असून, औरंगाबाद, जालना, नांदेड, उस्मानाबाद, वाशिम, धुळे, नगर, सातारा, सांगली या मतदारसंघांचा समावेश आहे. यासंदर्भात औरंगाबाद मंडप वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय शिंदे यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागत असते. निवडणुकीत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण असते. त्यासाठी मोठ्या मंडपाची मागणी असते. याशिवाय केटरिंगची कामे, तसेच निवडणुकीत मतदान केंद्रात मंडप, बल्ल्यांचे बॅरिकेटस् आदी लावण्यात येतात.

यासाठी शासन टेंडर काढत असते. त्यात शहरातील ६ मंडप व्यावसायिकांना ९ मतदारसंघांतील काम मिळाले आहे. यात शहरातील ३ हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. तसेच त्या मतदारसंघातील मजुरांकडूनही आम्ही कामे करून घेतो. तसेच पत्रे, बल्ली, कूलर, खुर्ची, टेबल, फॅन, लाईट, जनरेटर, तसेच सामान नेण्यासाठी गाड्यांचा वापर करावा लागतो. या सर्वांची जमवाजमव करावी लागते. अशा एकूण १३ ते १४ हजार जणांना यातून काम मिळते. प्रत्येक तालुक्यासाठी ३० ते ४० लोकांची टीम सज्ज ठेवावी लागते. यामुळे महिनाभर रोजगार मिळतो. 

गणेश काथार या मंडप व्यावसायिकाने सांगितले की, त्यांना दोन मतदारसंघांतील टेंडर मिळाले आहे. याच वेळेस लग्नसराई आहे. निवडणुकीचे काम घेतल्यावर लग्नसराईत लक्ष देता येत नाही. यामुळे लग्नाच्या हंगामावर पाणी सोडावे लागते; पण ते नुकसान निवडणुकीच्या कामातून भरून निघते. 

निवडणूक, लग्नहंगाम एकाच वेळी 
मे महिन्यात निवडणूक व लग्नाचा हंगाम एकाच वेळी आला आहे. ज्यांनी निवडणुकीत मंडपाचे शासकीय टेंडर घेतले त्यांना लग्नसराईत कामे करता येत नाहीत. मात्र, शहरातील अन्य मंडप व्यावसायिक लग्नाची कामे करतात. ६ मोठ्या मंडपवाल्यांचे काम या बाकीच्या छोट्या व्यावसायिकांना मिळते. 

Web Title: Lok Sabha Election 2019: pavilion owners are benefit in Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.