औरंगाबाद विभागात एकाच कन्येला मिळाली वनसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 05:23 PM2018-09-04T17:23:25+5:302018-09-04T17:24:19+5:30

कन्यारत्नाचे स्वागत व पर्यावरण संवर्धन या उद्देशाने वन विभागातर्फे जुलै महिन्यात कन्या वनसमृद्धीची घोषणा करण्यात आली.

Forest conservation has been given to one daughter in Aurangabad division | औरंगाबाद विभागात एकाच कन्येला मिळाली वनसमृद्धी

औरंगाबाद विभागात एकाच कन्येला मिळाली वनसमृद्धी

googlenewsNext

- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून औरंगाबाद विभागात 'कन्या वनसमृद्धी' या योजनेचा शुभारंभ केला जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार दि.१५ आॅगस्ट रोजी कन्नड तालुक्यातील हतनूर या गावी एका कन्येच्या पालकांना दहा रोपटी देण्यात आली. यामध्ये आंब्याची पाच, जांभळाची तीन आणि बदामाची दोन रोपटी आहेत. 

वनक्षेत्राव्यतिरिक्त जास्तीत जास्त क्षेत्र वनाखाली आणणे, पर्यावरण, वृक्षसंवर्धन, वृक्ष लागवड, संगोपन आणि संवर्धन जैवविविधता आदींबाबत सध्याच्या आणि भावी पिढीमध्ये आवड निर्माण करणे, तसेच मुलींच्या घटत्या संख्येवर नियंत्रण आणणे, हे प्रयत्न या योजनेतून केले जाणार आहेत. या योजनेकरिता राज्यासाठी प्रथम वर्षात किमान दोन लाख रोपे उपलब्ध होणार असून, त्यानंतर प्रतिवर्षी १० टक्क्यांनी या संख्येत वाढ करण्यात येईल.

ही योजना मुळातच उशिरा सुरू झाली आहे. तसेच कामाचा इतर व्याप आणि मर्यादित कर्मचारी यामुळे या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे दि.१५ आॅगस्ट रोजी एका मुलीच्या पालकांना रोपटी वाटप करून योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. संबंधित ग्रामपंचायतींना योजनेविषयी माहिती देण्यात आली असून, त्यांच्याकडून लाभार्थी होऊ शकणाऱ्यांची नावे मागविण्यात आली आहेत, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

अजूनही पाटी कोरीच
योजनेचा शुभारंभ झाला असला तरी अजूनही लाभार्थ्यांच्या यादीची पाटी कोरीच असल्याचे लक्षात येते. ग्रामीण भागातील खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळण्यासाठी या योजनेचा प्रचार होणे आवश्यक आहे. लागवड केलेल्या झाडांपासून मिळणारे सर्व उत्पन्न मुलीच्या कौशल्य विकास, उच्चशिक्षण आणि रोजगार मिळविणे तसेच मुलीच्या भविष्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार उपयोगात आणता येईल. ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात दोन मुली जन्माला येतील व त्यानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या नियंत्रित केली जाईल, अशांनाच केवळ या योजनेचा लाभ मिळविता येईल.एक मुलगा व एक मुलगी असणाऱ्या कुटुंबातील मुलीलाही या योजनेचा लाभ मिळू शकेल. योजनेचा लाभ मिळण्यासाठी मुलीच्या जन्मानंतर पालकांनी ग्रामपंचायतीमध्ये नावनोंदणी करावी.नावनोंदणी केल्यानंतर मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यात दि. १ ते ७ जुलै या काळात पालकांना वृक्षारोपणासाठी मोफत रोपटी दिली जातील.

Web Title: Forest conservation has been given to one daughter in Aurangabad division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.