‘त्या’ शेतकऱ्याच्या आत्महत्येची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 07:34 PM2018-12-04T19:34:01+5:302018-12-04T19:36:00+5:30

तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर केल्यामुळे औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग सुंदर्डे यांनी नुकतीच आत्महत्या केली.

That Farmer's Suicide case investigated by crime branch | ‘त्या’ शेतकऱ्याच्या आत्महत्येची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी 

‘त्या’ शेतकऱ्याच्या आत्महत्येची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी 

googlenewsNext
ठळक मुद्देकृष्णापूरवाडीचे प्रकरण  विधानसभा अध्यक्षांकडून कुटुंबाचे सांत्वन  

फुलंब्री (औरंगाबाद ) : तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावावर केल्यामुळे औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग सुंदर्डे यांनी नुकतीच आत्महत्या केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी या गावास भेट देऊन या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येईल, यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी मयत भावसिंग यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. 

दोन एकर तीन आर. जमीन निहालसिंग वाळूबा सुंदर्डे, खुशालसिंग वाळूबा सुंदर्डे, महासिंग वाळूबा सुंदर्डे व परमजीतसिंग धिल्लो यांनी तलाठी पुंजाबा बिरारे यांच्याशी संगनमत करुन परस्पर नावावर केल्याने २५ नोव्हेंबर रोजी भावसिंग सुंदर्डे यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.

वास्तविक यासंदर्भात शेतकरी भावसिंग सुंदर्डे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तलाठी बिरारे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. पण कुणीही लक्ष न दिल्याने त्यांनी जीवनयात्रा संपविली. यानंतर प्रकरणी वरील चार जणांविरुद्ध फुलंब्री पोलिसात गुन्हा दखल करण्यात आला. 
माझ्या वडीलांच्या मृत्यूस तलाठी पुंजाबा बिरारे हाही जबाबदार असून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मयताच्या मुलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती, परंतु अजून कारवाई न झाल्याने मयताचे कुटुंब चिंतेत आहे.

तलाठ्याविरुद्ध ‘एसीबी’ची केस सुरु
या प्रकरणातील तलाठी पुंजाबा बिरारे हा शेंद्रा येथे कार्यरत असताना २०१५ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला होता, हे प्रकरण अजून बोर्डावर आलेले नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. मंगळवारी सीआयडीच्या पथकाने कृष्णापूरवाडी येथे जाऊन मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाचे जाबजबाब घेतले. समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा मोबदला मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने तलाठ्यांकडून अशी गैर कामे होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: That Farmer's Suicide case investigated by crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.