आग लागल्यानंतर श्वानाच्या भुंकण्याने जाग आली; झाडावरून उड्या मारल्याने ९ कामगार बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 04:39 PM2024-01-01T16:39:18+5:302024-01-01T16:40:41+5:30

उद्योगनगरीतील सनशाईन एंटरप्रायजेस कंपनीला भीषण आग, सहा कामगारांचा होरपळून

After the fire was awakened by the barking of a dog; 9 workers were saved by jumping from the tree | आग लागल्यानंतर श्वानाच्या भुंकण्याने जाग आली; झाडावरून उड्या मारल्याने ९ कामगार बचावले

आग लागल्यानंतर श्वानाच्या भुंकण्याने जाग आली; झाडावरून उड्या मारल्याने ९ कामगार बचावले

वाळुजमहानगर : वाळूज उद्योगनगरीतील कॉटन व लेदरचे हॅण्डग्लोव्हज व साहित्य बनविणाऱ्या सनशाईन एंटरप्रायजेस (प्लॉट नं. सी-२१६) या कंपनीला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कंपनीत अडकलेल्या सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर एका चिमुकल्यासह नऊ कामगार या आगीतून बचावले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाळूज उद्योगनगरीत साबेरखान शब्बीरखान पठाण (रा. बायजीपुरा) यांची सनशाईन एंटरप्रायजेस या नावाची कंपनी आहे. या कंपनीत कॉटन व लेदरचे हातमोजे तसेच इतर साहित्य बनविण्याचे काम केले जाते. हसीनोमुद्दीन मुस्ताक शेख (४०, रा. डलौखर, ता. मिर्जापूर, जि. मधुबनी, बिहार) हे ठेकेदार असून ते कुटुंबासह कंपनीत वास्तव्यास होते. कंपनीत त्यांच्यासह १४ कामगार काम करतात. शनिवारी मध्यरात्री रात्री एक वाजेच्या सुमारास आग लागली होती. सुरुवातीला कंपनीत असलेल्या श्वानाने मोठ-मोठ्याने भुंकण्यास सुरुवात केल्याने ठेकेदार हसीनोमुद्दीन यांची पत्नी इस्मतजहॉं शेख (३६) ही झोपेतून जागी झाली. प्रसंगावधान राखत इस्मतजहॉं यांनी आरडा-ओरडा केल्याने कंपनीच्या वरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपलेले कामगार जागे झाले. मात्र, क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. सर्व कामगार कंपनीत अडकून बसले होते. या कामगारांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. बाजूच्या हीना इंडस्ट्रीज या कंपनीत काम करणारे गंगाधर कदम, प्रदीप मौर्य, कंपनी मालक इम्रान पठाण, फिरोज पठाण यांनी तत्काळ मदतीसाठी आले. मात्र, कंपनीचे लोखंडी प्रवेशद्वार व शटर बंद होते. यानंतर गंगाधर कदम व प्रदीप मोर्य या दोघांनी दुचाकीवर जाऊन वाळूज अग्निशमन दल व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी कंपनीला आग लागल्याची माहिती दिली.

कामगारांनी झाडावर चढून उड्या घेत वाचवला जीव
कंपनीतील रूममध्ये झोपलेल्या दिलीपकुमार चंद्रिका मंडल (२४), मो. दिनारुल मो. एहरार (२०), मो. अफरोज मो. शोएब (२३), मो. हैदर अली (३२), मो. इरशाद जफरोद्दीन आलम या ५ कामगारांनी प्रसंगावधान राखत कंपनी कपाउंडलगत असलेल्या झाडावर चढले. झाडावरून उड्या घेत स्वत:चा जीव वाचवला. घटनास्थळी मदतीसाठी आलेल्या एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व परिसरातील नागरिकांनी ठेकेदार हसिनोद्दीन शेख याने पत्नी इस्मतजहॉं (३२), मुलगा मुज्जमील शेख (५) व मुलगी आयशा (दीड वर्ष) यांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र हसिनोद्दीन शेख यांचे वडील मो. मुस्ताक मो. इब्राहिम (६२), कोशर आलम जफरुद्दीन (३७), मो. इक्बाल मो. एहरार (१७), रामलाल रामविलास सिंदरिया (४६), मो. मार्गब आलम सहाबुद्दीन (३२, सर्व रा. बिहार) व रियाज बशीर सय्यद (२५, रा. रोषनगाव, ता. बदनापूर) हे धुरामुळे गुदमरून बेशुद्ध पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या बेशुद्ध पडलेल्या कामगारांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.

अग्निशमन विभाग व पोलिसांची मदत
अग्निशमन दलाचे जवान तसेच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक गणेश ताठे, सहा. निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक दीपक रोठे, सचिन पागोटे, राहुल निर्वळ, पोहेकॉ. अभिमन्यू सानप, पोना. नवाब शेख, पोकॉ. हनुमान ठोके, नितीन इनामे, विक्रम वाघ, योगेश शेळके, राजाभाऊ कोल्हे आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. वाळूज अग्निशमन दल व मनपाचे प्रत्येकी २, बजाज ऑटो व चिकलठाणा अग्निशमन दलाचा १ अशा एकूण ६ बंबानी पहाटे ३.३० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत होरपळलेल्या ६ कामगारांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

पोलिस आयुक्तांकडून घटनास्थळाची पाहणी
रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावलेल्या कामगारांकडून घटनेची माहिती जाणून घेत तपासासंदर्भात विविध सूचना दिल्या. याप्रसंगी पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त महेंद्र देशमुख आदींची उपस्थिती होती. या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कंपन्याचे अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. याप्रकरणी उपनिरीक्षक राहुल निर्वळ यांच्या फिर्यादीवरून कंपनी मालक साबेरखान शब्बीरखान पठाण (रा. न्यु बायजीपुरा) व ठेकेदार मो. हसिनोमुद्दीन मो. मुस्ताक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश ताठे करीत आहेत.

Web Title: After the fire was awakened by the barking of a dog; 9 workers were saved by jumping from the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.