७६६ हेक्टरमध्ये धोका पत्करून हळद लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:53 PM2018-02-05T22:53:55+5:302018-02-05T22:54:16+5:30

धान, सोयाबीन व भाजीपाला या दोनच पिकांवर अवलंबून राहणाऱ्या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात प्रथमच मिरची तसेच हळद पिकाची लागवड करून परंपरेच्या परिघाबाहेर जाण्याचा धाडसी प्रयत्न केला.

Harvesting turmeric with a risk of 766 hectares | ७६६ हेक्टरमध्ये धोका पत्करून हळद लागवड

७६६ हेक्टरमध्ये धोका पत्करून हळद लागवड

Next
ठळक मुद्देपाच तालुक्यात पीकपालट : मिरची लागवडीतही वाढ

राजेश मडावी।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : धान, सोयाबीन व भाजीपाला या दोनच पिकांवर अवलंबून राहणाऱ्या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा खरिप आणि रब्बी या दोन्ही हंगामात प्रथमच मिरची तसेच हळद पिकाची लागवड करून परंपरेच्या परिघाबाहेर जाण्याचा धाडसी प्रयत्न केला. ६९४ हेक्टरमध्ये मिरची, तर ७६६ हेक्टर क्षेत्रात हळद लागवड करून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे.
जिल्ह्यातील शेतजमिन केवळ धान व सोयाबीन उत्पादनासाठीच पूरक असल्याचा समज आजही अनेक शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे या दोन पिकांना टाळून आर्थिकदृष्ट्या नफा मिळवून देणाऱ्या अन्य पिकांचा फारसा विचार करीत नाही. गतवर्षी कृषी विभागाने धान, सोयाबिन, कापूस व भाजीपाला पिकांविषयी जागृती मोहीम राबविली.
मात्र, अन्य नगदी पिकांच्या लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले नाही. परिणामी, आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांनी नव्या पिकांविषयी स्वत:च माहिती जाणून घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने हळदी पिकाचा समावेश होता.
हे पीक घेणाºया शेतकऱ्यांची संख्या आधीच कमी असताना चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, जिवती, राजुरा आणि ब्रह्मपुरी तालुक्यात मिरची पिकांचीही लागवड केली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी २५० ते ३०० हेक्टर क्षेत्रांत हळदीचे पीक लागवडीखाली होते. यंदा हे क्षेत्र ७६६ हेक्टर क्षेत्रापर्यंत विस्तारले. शेतकºयांना योग्य मार्गदर्शन आणि शासनाकडून प्रोत्साहन मिळाल्यास हळद लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ होवू शकते.
तीळ उत्पादनाकडेही कल
भात शेती करणाऱ्या मूल, सावली, नागभीड, ब्रह्मपुरी व सिंदेवाही या पाच तालुक्यात खरीप आणि रब्बी हंगामात पहिल्यांदाच ५७१ हेक्टर क्षेत्रात तिळाची लागवड झाली. अन्य पिकांमध्ये आंतरपिक म्हणून तिळ लागवडीचा विचार न करता बहुतेक शेतकऱ्यांनी या पिकाची स्वतंत्र निवड केल्याचे यंदा दिसून आले आहे. सावली तालुक्यात सर्वाधिक २५२ हेक्टर क्षेत्रावर तीळ लागवड करण्यात आली आहे.
आधुनिक कृषी प्रशिक्षणच तारणार
मिरची, हळद व तिळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठी जोखीम पत्करून यंदा शेती केली. यातून किती उत्पादन निघेल, याची अद्याप खात्री नाही. परंतु, पारंपरिक पिकांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी अन्य जिल्ह्यातील शेतकºयांकडून माहिती मिळवून नव्या प्रयोगाची कास धरली. त्यामुळे कृषी विभागाने पुढील हंगामात या तिन्ही पिकांसाठी गावागावांत प्रशिक्षण सुरू केल्यास हताश शेतकºयांना संजीवनी मिळू शकेल.

Web Title: Harvesting turmeric with a risk of 766 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.