फायद्यातोट्याचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:41 PM2018-01-24T23:41:07+5:302018-01-24T23:41:34+5:30

मोबाईल व इंटरनेट वापराबाबत आपण सर्वज्ञ आहोत, असा कितीही दावा असला तरी आपण विविध मोबाईल अ‍ॅप्स आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही, याची खात्री असेल तरच माहिती द्यावी.

Consider the benefits | फायद्यातोट्याचा विचार करा

फायद्यातोट्याचा विचार करा

Next
ठळक मुद्देतज्ज्ञांचा सल्ला : माध्यमांसाठी सायबर जागृती कार्यशाळा

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : मोबाईल व इंटरनेट वापराबाबत आपण सर्वज्ञ आहोत, असा कितीही दावा असला तरी आपण विविध मोबाईल अ‍ॅप्स आणि वेबसाईटवर वैयक्तिक माहिती देताना तिचा गैरवापर होणार नाही, याची खात्री असेल तरच माहिती द्यावी. घरातील प्रत्येक व्यवहार आॅनलाईन होत आहे. ही सुविधा आहे. मात्र सुविधा घेताना फायद्यातोट्यांचा विचार करणे गरजेचे आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी आपल्या मार्गदर्शनातून दिला.
जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सायबर सेलमार्फत आयोजित कार्यशाळेमध्ये दोन तासांच्या विचार मंथनात जनतेला याबाबत जागरुक करण्याचे माध्यमांचे दायित्व त्यांनी पार पाडावे, असे आवाहनही करण्यात आले.
महाराष्ट्र सायबरचे प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून ट्रान्सफोर्मिंग महाराष्ट्र अंर्तगत पत्रकार आणि माध्यमांसाठी सायबर जाणीव जागृती उपक्रम महाराष्ट्रभर सुरु आहे. चंद्रपूर जिल्हा सायबर सेल आणि जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांनी सायबर गुन्हे, सायबर विश्व, सायबर हॅकर, सायबर तंत्रज्ञान याविषयी विविध सादरीकरणातून माहिती जाणून घेतली. या विषयाबद्दल आपल्या शंकांचे समाधान करवून घेतले. तसेच सायबर कायद्याच्या उपयुक्ततेविषयी अधिक माहितीही घेतली.
कार्यशाळेत सायबर सेलचे पोलीस निरीक्षक के.बी.शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विकास मुंडे व मुजावर अली यांनी सायबर गुन्हे कसे घडतात, याची उदाहरणांसह माहिती दिली. ते म्हणाले, इंटरनेट स्वस्त आणि सहज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आपण उत्साहाच्या भरात आपली वैयक्तिक माहिती कुठे ना कुठे मोबाईलवर अ‍ॅप्स आणि वेबसाईटच्या माध्यमातून टाकत असतो. पण या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. कुणी कितीही सांगितले तरी ही माहिती पूर्णत: सुरक्षित असतेच असे नव्हे. आता इंटरनेट आॅफ थिंग्सचा जमाना आहे. अनेक घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये इंटरनेटची सोय आहे. याठिकाणीदेखील काही माहिती टाकताना आपण काळजी घेतली पाहिजे.
फेसबुकसारख्या मायाजाळात तरुण मुलं एवढेच नव्हेतर सुशिक्षित रोज फसत आहेत. त्यामुळे सावध राहणे हेच यामध्ये महत्वाचे आहे. त्यासाठी नेट वापरणाºया प्रत्येकाला काही मुलभूत बाबींची माहिती माध्यमातून देणे गरजेचे आहे. त्यासाठी पत्रकारांनी आपल्या वृत्तपत्रांमध्ये अशा प्रकारच्या स्तंभांना, लेखांना जागा द्यावी. सोप्या भाषेत याबाबतचे मार्गदर्शन करावे, अशी विनंती यावेळी सायबर सेलच्या अधिकाºयांनी केली.
मुजावर अली यांनी चंद्रपूर व परिसरातील सायबर क्राईममधील घटनाक्रमांचे उदाहरण देत आपल्या अवतीभवती सुरु असलेल्या फसवणुकीच्या अनेक घटनाक्रमांना उजागर केले. कार्यशाळेला जिल्हाभरातील विविध माध्यम प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सावधानता बाळगा
काही दिवसांपासून बँकेच्या एटीएममधून फसवणूक करून पैसे काढण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये ग्राहकाने सावधानता बाळगायची आहे. परंतु बँकेचीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने मोठी जबाबदारी आहे, ग्राहकाची चूक नसेल तर नियमाप्रमाणे विशिष्ट दिवसात त्याला पैसे मिळणे आवश्यक आहे, असेही यावेळी विकास मुंडे यांनी सांगितले.

Web Title: Consider the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.