ठळक मुद्दे पैठण, औरंगाबाद व जालना परिसरात या मशिनरी घेऊन जाण्यासाठी मांजरा प्रशासनाकडे  मागणीही करण्यात आली आहे. येथील मशिनरी इतरत्र हलविली तर या परिसरातील कॅनॉलची दुरूस्ती व देखभालीचे काम रखडेल.यामुळे जे पाणी शेतक-यांना नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे ते पुन्हा जानेवारीतच उपलब्ध होईल.

- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई (बीड): जिल्ह्याबाहेरील मोठ्या धरणावरील कॅनॉलची दुरूस्ती करण्यासाठी मांजरा धरणाच्या ताब्यात असणारी मशिनरी नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. पैठण, औरंगाबाद व जालना परिसरात या मशिनरी घेऊन जाण्यासाठी मांजरा प्रशासनाकडे  मागणीही करण्यात आली आहे. येथील मशिनरी इतरत्र हलविली तर या परिसरातील कॅनॉलची दुरूस्ती व देखभालीचे काम रखडेल. याचा फटका  शेतक-यांना निमूटपणे सहन करावा लागेल. जे पाणी शेतक-यांना  नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे. ते पुन्हा जानेवारीतच उपलब्ध होईल. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या बोटचेपे धोरणाचा फटका शेतक-यांना बसतो आहे. 

धनेगाव येथील मांजरा धरण यावर्षी तुडुंब भरले. धरण भरल्यामुळे पाण्याच्या अपेक्षेवर या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड सुरू झाली. तसेच रब्बी हंगामातील पिकांनाही कॅनॉलच्या  सुटणा-या पाण्याचा मोठा दिलासा मिळू शकतो. रब्बी हंगामासाठी सुटणारे पहिले पाणी नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यात सुटेल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. मात्र यासाठी कॅनॉलची दुरूस्ती होणे गरजेचे आहे. अद्याप इथल्याच कॅनॉलच्या दुरूस्तीचे काम सुरू होण्यापूर्वीच येथील मशिनरी पैठण, जालना व औरंगाबाद परिसरातील कॅनॉलच्या दुरूस्तीसाठी देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र व या संदर्भातील पाठपुरावा त्या ठिकाणांहून सुरू आहे. येथील मशिनरी त्या परिसरात गेल्यास येथील कामे रखडली जाऊन तब्बल एक ते दीड महिन्याचा उशीर पाणी सुटण्यासाठी होईल. कॅनॉलचे पहिलेच पाणी जर जानेवारीत गेले तर पेरलेल्या पिकांना पाणी न मिळाल्यास पुन्हा रबी हंगाम संकटात सापडणार आहे. अशा स्थितीत मांजरा धरणाच्या ताब्यातील मशिनरी इतरत्र न हलवता, परिसरातील दुरूस्तीचे कामे तात्काळ सुरू झाली तरच या परिसरातील शेतकºयांना धरणाच्या पाण्याचा लाभ होईल, अन्यथा याचा मोठा फटका शेतकºयांना निमूटपणे सहन करावा लागणार आहे. 

१८,२२३ हेक्टर शेतजमीन येते ओलिताखाली
मांजरा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यावर एकूण १८ हजार २२३ हेक्टर शेतजमीन  सिंचनाखाली येते. डाव्या कालव्यावर १० हजार ५५८ हेक्टर तर उजव्या कालव्यावर ७ हजार ६६५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते. गेल्या तीन वर्षात मांजरा धरणात पाणी नसल्याने या परिसरातील शेतक-यांची उपेक्षा झाली होती. आता धरणात मुबलक पाणी आले तर मशिनरी हलविण्याचा घाट घातल्याने लाभक्षेत्रात येणा-या शेतक-यांची घोर उपेक्षा होणार आहे. 

औरंगाबादच्या बैठकीत दिले होते आदेश
पैठण, जालना व  औरंगाबाद येथील कॅनॉलची दुरूस्ती करण्यासाठी मांजरा धरणाच्या ताब्यातील मशिनरी पाठवून देऊन या परिसरातील दुरूस्ती करून घ्यावी, असे तोंडी आदेश औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत देण्यात आले होते. या आदेशानुसारच या परिसरातील मशिनरी इतरत्र हलविण्याची मागणी झाली. या संदर्भात मांजरा धरणाचे उपअभियंता महेंद्र जोशी यांच्याकडे विचारणा केली असता या वृत्त्तास त्यांनी दुजोरा दिला.

मशिनरी हलवू देणार नाही - नंदकिशोर मुंदडा 
मांजरा धरणाची निर्मिती बीड जिल्ह्याच्याच भूमित झाली आहे. येथील शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी धरणासाठी अधिग्रहण झाल्या त्यांना या पाण्याचा लाभ मिळणे क्रमप्राप्त आहे.  मांजरा धरणाच्या मशिनरी जर इतरत्र हलवून येथील शेतक-यांची उपेक्षा होणार असेल तर त्या मशिनरी इतरत्र हलवू दिल्या जाणार नाहीत. यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करू तसेच या संदर्भात न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कै. विमलताई मुंदडा विचारमंचचे  प्रमुख नंदकिशोर मुंदडा यांनी दिला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.