गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत द्वारी- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 05:18 PM2022-07-31T17:18:50+5:302022-07-31T17:19:15+5:30

3600 हेक्टरवर सोयाबीन गोगलगायींनी फस्त केल्या, तीन-चार पेरण्या करूनही काही पदरात येईना

Major crop losses due to snail infestation; State Government should give immediate help- Ajit Pawar | गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत द्वारी- अजित पवार

गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत द्वारी- अजित पवार

Next

अंबाजोगाई- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यासह अनेक ठिकाणी सुमारे 3600 हेक्टरवर सोयाबीन पिकाचे गोगलगायीनी शेंडे खाऊन नुकसान केले. अनेक शेतकऱ्यांनी 3-4 वेळा पेरण्या करून विविध उपायदेखील केले, मात्र तरीही गोगलगायींचा प्रादुर्भाव आटोक्यात येईना. या पद्धतीच्या नुकसानीचा पीक विमा निकषांमध्ये समावेश नसून, संबंधित शेतकऱ्यांना तातडीने गोगलगायीचे नियंत्रण करणे व दुबार पेरणीसाठी जमीन तयार करून पेरणी करणे यासाठी विशेष आर्थिक मदत करण्याची गरज आहे. प्रशासनाने तातडीने याबाबत आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा व राज्य सरकारने या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. 

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत अजित पवार हे आज बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आदी तालुक्यांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे गोगलगायींन्नी उध्वस्त केलेल्या सोयाबीनच्या शेतात जाऊन पाहणी केली व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली. 

अशा प्रकारचे संकट शेतकऱ्यांना भेडसावल्यास कृषी विभाग विविध तंत्रज्ञानाद्वारे उपाययोजना करणे, शास्त्रज्ञांना नवीन उपाय शोधायला लावणे, कृषी विद्यापीठातील उपलब्ध माहितीचा विनियोग करणे अशा गोष्टी अपेक्षित असतात, मात्र इथे दोनच व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून राज्याचे सरकार चालवत असून ते प्रत्येक खात्याशी संबंधित प्रत्येक नागरिकांचे समाधान करू शकत नाहीत, याची त्यांना जाणीव असायला हवी, असेही अजित पवार यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार नाही, जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत त्यामुळे पीकविमा, कृषी कर्ज, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अशा अनेक बाबी प्रलंबित असल्याचेही यावेळी अजित पवार यांनी नमूद केले. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आ. सतीश चव्हाण, आ. संजय दौंड,  पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, राजकिशोर मोदी, गोविंद देशमुख, दत्ता पाटील यांसह अनेक पदाधिकारी, स्थानिक शेतकरी, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Web Title: Major crop losses due to snail infestation; State Government should give immediate help- Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.