कवली बसस्थानकात घुसला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:26 AM2018-07-12T00:26:14+5:302018-07-12T00:26:58+5:30

प्रवासी शेड कोसळले : आठ प्रवासी बालंबाल बचावले

 Truck to Kawli bus station | कवली बसस्थानकात घुसला ट्रक

कवली बसस्थानकात घुसला ट्रक

googlenewsNext

सोयगाव : सोयगावकडून धुळ्याकडे रासायनिक खताने भरलेल्या भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने तो सरळ कवली गावाच्या बसस्थानकात घसल्याने प्रवासी शेड कोसळून नुकसान झाले. यावेळी प्रसंगावधान राखल्याने आठ प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना बुधवारी पहाटे घडली. दरम्यान, बसस्थानकावरून नुकतीच पहिलीच बस निघून गेली आणि शालेय विद्यार्थ्यांचीही बस नुकतीच गेल्याने मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी ट्रकचालक आकाश बडगुजर (२०, रा.देवपूर धुळे) यास ताब्यात घेतले आहे. सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गावरून सोयगावकडून धुळ्याकडे जाणारा ट्रक (क्र. एम.एच.-१८-एए-८९३२) हा भरधाव वेगाने जात असताना कवली गावाजवळील बसस्थानकाजवळ ब्रेक निकामी झाले. चालकाचेही यामुळे नियंत्रण सुटले अन् ट्रक बसस्थानकात आरपार शिरल्याने क्षणार्धात बसस्थानक कोसळले. या वस्तीच्या बाजूलाच ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत आहे. ट्रक उजव्या बाजूने वळून वस्तीत अथवा ग्रामपंचायतीमध्ये शिरला असता, तर अनर्थ झाला असता.
सोयगाव आगाराची पाचोरा-औरंगाबाद ही बस नुकतीच या बसस्थानकावरून निघून गेली होती. या बसमध्ये बसस्थानकातून पाच प्रवासी निघून गेल्यावर आणि आठ प्रवासी मालेगाव-सोयगाव या दुसऱ्या बसची प्रतीक्षा करत येथे थांबलेले होते. ट्रक बसस्थानकात घुसत असल्याचे काही क्षणात प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. पोलीस पाटील निवृत्ती पाटील, ग्रामपंचायत सदस्य गजानन हाळनोर, सीताराम पाटील, अनिल धनेधर, बाजीराव केंडे, उखर्डू साळवे, सरदार तडवी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी पंचनामा करून चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  Truck to Kawli bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात