क्रांतीचौकातील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हलविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:47 PM2019-07-09T23:47:31+5:302019-07-10T12:20:25+5:30

क्रांतीचौकातून सुरक्षित स्थळी पुतळा नेण्यास तब्बल ९ तासांचा कालावधी लागला.

Shivaraya's horse-drawn statue was moved | क्रांतीचौकातील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हलविला

क्रांतीचौकातील शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हलविला

googlenewsNext
ठळक मुद्देपुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाला अखेर महापालिकेने सुरुवात केली. मध्यरात्री ३.४५ वाजता शिवरायांचा पुतळा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आला.प्रशासनाची तारेवरची कसरत

औरंगाबाद : क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाला अखेर महापालिकेने सुरुवात केली. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा सोमवारी मध्यरात्री हलविण्यात आला. सकाळी ८.३० वाजता चिकलठाणा एमआयडीसीमधील मडिलगेकर यांच्या स्टुडिओमध्ये शिवरायांचा पुतळा सुरक्षित ठेवण्यात आला असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

शिवजयंती उत्सव समितीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी मनपाकडे केली होती. १ कोटी ८४ लाख रुपये खर्च करून पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम गायत्री आर्किटेक्ट यांना देण्यात आले. सोमवारी रात्री ११ वाजता पुतळा हलविण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक राजेंद्र जंजाळ, माजी नगरसेवक समीर राजूरकर, विनोद पाटील, उपअभियंता बी. के. परदेशी, नाना पाटील, शिवभक्त पांडुरंग राजे पाटील, शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्यासह मनपाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

कटर आणि ब्रेकरच्या साहाय्याने पुतळा काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. मध्यरात्री ३.४५ वाजता शिवरायांचा पुतळा के्रनच्या साहाय्याने काढण्यात आला. तीन टन वजन असलेला पंचधातूपासून तयार केलेला हा शिवरायांचा पुतळा उड्डाणपुलाखालून नेण्यास अडथळा येत असल्यामुळे आयशर ट्रक उड्डाणपुलावर उभा करून क्रेनच्या साहाय्याने पुतळा त्यावर ठेवण्यात आला. गरवारे स्टेडियमजवळ उच्च दाबाची वीज वाहिनी असल्यामुळे पुतळा नेण्यास अडथळा आला. महापौर घोडेले यांनी गरवारे कंपनीचे व्यवस्थापक दंडे यांच्याशी संपर्क साधून गरवारे कंपनीमधून पुतळा घेऊन जाण्यासाठी परवानगी घेतली. गरवारे कंपनीमधील रस्त्याने पुतळा चिकलठाणा एमआयडीसीमधील मडिलगेकर यांच्या स्टुडिओमध्ये मंगळवारी सकाळी ८.३० वाजता सुरक्षितरीत्या ठेवण्यात आला. या कामासाठी तब्बल ९ तासांचा कालावधी लागला.

Web Title: Shivaraya's horse-drawn statue was moved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.