काँग्रेसच्या आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्हा आज करणार अहवाल सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:39 AM2019-06-07T11:39:51+5:302019-06-07T11:45:10+5:30

पराभवाची कारणमीमांसा, आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी आदी मुद्यांवर होणार चर्चा

In the review meeting of the Congress, Aurangabad district will present its report today | काँग्रेसच्या आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्हा आज करणार अहवाल सादर 

काँग्रेसच्या आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्हा आज करणार अहवाल सादर 

googlenewsNext
ठळक मुद्दे लोकसभा निवडणुकीतील पराभवावरही बैठकीत चर्चा होईल.संभाव्य उमेदवारांची चर्चा आदी ठळक मुद्यांची यावेळी चर्चा होईल.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रदेश काँग्रेसतर्फे दि. ७ व ८ जून रोजी जिल्हावार आढावा घेण्यात येणार आहे. मुंबईच्या टिळक भवनात यासाठी त्या त्या जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराध्यक्ष, लोकसभेचे उमेदवार, आजी-माजी आमदार, प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. 

आज सकाळी १० वा. औरंगाबाद जिल्ह्याचा आढावा घेण्यात येईल. त्यासाठी ४५ मिनिटे देण्यात आली आहेत. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल, शहर-जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव तायडे, लोकसभेचे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड यांच्यासह आणखी काही मंडळी मुंबईकडे रवाना झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा, आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी, संभाव्य उमेदवारांची चर्चा आदी ठळक मुद्यांची यावेळी चर्चा होईल. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रत्येक पदाधिकारी आपला लेखी अहवाल सादर करील. दोन दिवसांपूर्वीच अशोकराव चव्हाण यांनी औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांशी सिल्लोड विधानसभेच्या अनुषंगाने चर्चा केली होती. नांदेडकडे रवाना होताना गाडीत करमाडपर्यंत ही चर्चा अनिल पटेल, नामदेवराव पवार, प्रभाकर पालोदकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील यांच्यात झाली. सिल्लोडमध्ये यावेळी विधानसभेची निवडणूक मोठी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. वाढता विरोध असूनही अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश मिळालाच आणि उमेदवारीही मिळाली तर काँग्रेसतर्फे तगडा उमेदवार द्यावा यादृष्टीने हालचाली वाढल्या आहेत. त्यादृष्टीने प्रभाकर पालोदकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन अशा नावांवर चर्चा चालू आहे. 

नुकत्याच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवावरही उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार न केलेल्या कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच प्रभारी जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काही दिवसांमध्ये काय काय घडते, हे पाहणे औत्सुक्याचेच ठरेल. 

Web Title: In the review meeting of the Congress, Aurangabad district will present its report today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.