औरंगाबादेत कडकडाटासह बरसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:41 AM2018-06-22T00:41:09+5:302018-06-22T00:41:42+5:30

शहर आणि परिसरात गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उरात धडकी भरवणाऱ्या विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला.

Aurangabad, with a thunderous rain! | औरंगाबादेत कडकडाटासह बरसला!

औरंगाबादेत कडकडाटासह बरसला!

googlenewsNext
ठळक मुद्देजोरदार वृष्टी : शहरातील अनेक भागांतील घरांत पाणी; जिल्ह्यातही पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहर आणि परिसरात गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास उरात धडकी भरवणाऱ्या विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. तासभर बरसलेल्या या पावसाने हुसेन कॉलनी, समतानगर, एन-७ सिडकोसह इतर भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. चिकलठाणा वेधशाळेत रात्री ११.३0 वाजता ४७.४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.
शहरातील काही भागांमध्ये गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सायंकाळपर्यंत अधून मधून पावसाची भुरभुर सुरू होती. काही तासांसाठी खंड पडल्यानंतर रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पावसाला पुन्हा सुरुवात झाली. रात्री १० वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाचा जोर चांगलाच वाढला. याचवेळी उरात धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता.
पाऊस कोसळत असताना अधून मधून विजेचा जोरदार कडकडाट होत होता. पावसाच्या जोरदार धारांमुळे विविध भाग आणि रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. निराला बाजार येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्स, एन-७ सिडको आणि समतानगरातील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. या ठिकाणी मदतीसाठी अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेतली. पावसामुळे विशेषकरून जयभवानीनगरमधील नागरिकांमध्ये रात्री भीतीचे वातावरण होते. अतिक्रमणामुळे अरुंद नाल्यांतील पाणी घरांत येण्याची भीती होती.
ग्रामीण भागात काही परिसरात पाऊस
गुरुवारी सायंकाळी व रात्री जिल्ह्यातील काही भागांतच पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
पाचोड, आडूळ, लासूर स्टेशन, शिल्लेगाव, विहामांडवा, वासडी, चिकलठाण, सोयगाव, लिंबेजळगाव, पिशोर, फर्दापूर, अंभई, नागद, पळशी, हतनूर, दुधड, केºहाळा, नेवरगाव, बिडकीन, नीलजगाव, लाडसावंगी, ढोरकीन, सुंदरवाडी, कन्नड व परिसरात कमी-अधिक प्रमाणात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
काही भागात रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली.
वीज कोसळून २ बैल ठार
बिडकीनपासून जवळच असलेल्या निलजगाव तांडा येथे वीज कोसळून दोन बैल ठार झाले. येथील शेतकरी नानू रावजी राठोड यांनी गोठ्यात बैल बांधले होते. पेरणीची लगबग सुरू असताना बैलांचा वीज पडून मृत्यू झाल्यामुळे शेतकºयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. महसूल अधिकारी व पोउनि. बलभीम राऊत आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर शेतकºयाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Aurangabad, with a thunderous rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.