Atal Bihari Vajpayee : अटलजींचा मराठवाड्याशी विशेष स्नेह जडलेला होता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 04:25 PM2018-08-17T16:25:44+5:302018-08-17T16:27:01+5:30

Atal Bihari Vajpayee: संघ आणि जनसंघाच्या कामानिमित्त ते मराठवाड्यातही बऱ्याचदा आले होते. ज्या-ज्यावेळी अटलजी मराठवाड्यात आले त्यातील बहुतांश वेळी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन सावलीसारखे त्यांच्यासोबत होते.

Atal Bihari Vajpayee: Atalji had special affection with Marathwada | Atal Bihari Vajpayee : अटलजींचा मराठवाड्याशी विशेष स्नेह जडलेला होता

Atal Bihari Vajpayee : अटलजींचा मराठवाड्याशी विशेष स्नेह जडलेला होता

googlenewsNext

औरंगाबाद : अटल बिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षातील शुचिता आणि संस्कारशीलता संपल्यासारखे वाटत आहे. वाजपेयी यांचा देशातील विविध राज्यांत संचार होता. संघ आणि जनसंघाच्या कामानिमित्त ते मराठवाड्यातही बऱ्याचदा आले होते. ज्या-ज्यावेळी अटलजी मराठवाड्यात आले त्यातील बहुतांश वेळी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन सावलीसारखे त्यांच्यासोबत होते. पुढे तर अटलजींनीही प्रमोद महाजनांना मुलाप्रमाणे वागविले. त्यामुळेच अंबाजोगाई आणि मराठवाड्याशी त्यांचा विशेष स्नेह जडलेला होता. 

अटलजी नोव्हेंबर १९६७ मध्ये पहिल्यांदा प्रदेश जनसंघाच्या अधिवेशनानिमित्त औरंगाबादला आले. दीनदयाल उपाध्याय आणि अटलजी यांचा औरंगाबादेत त्यावेळी चार दिवस मुक्काम होता. दिवाण देवडी भागात तेव्हा सांगली बँक होती आणि बँकेच्या वरच्या मजल्यावर छोटेखानी गेस्टहाऊस होते. त्याठिकाणी दोघेही थांबले होते. शहागंजमधील गेंदा भवनमध्ये जनसंघाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. अधिवेशनाचा मुख्य कार्यक्रम माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. त्यानंतर खामगाव, नाशिक अशा ठिकाणी अटलजींच्या सभा झाल्या.  जनता दलाचे सरकार पायउतार झाल्यानंतर औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर अटलजींची अविस्मरणीय सभा झाली.

१९७३ मध्ये आर्य समाजाच्या वतीने लातूर येथे त्यांची सभा झाली. त्या वेळेस अनेक तरुण सायकलवर गेले होते. त्याकाळी सभास्थानी आजच्यासारखे सुरक्षाकडे नसायचे. ३१ आॅक्टोबर १९७७ मध्ये भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमासाठी अटलजी खोलेश्वर महाविद्यालयामध्ये आले होते. त्यांनी ठिकठिकाणी शिक्षक आणि संघ कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या भेटीत त्यांचे अंबाजोगाईमध्ये तीन कार्यक्रम उत्साहाने पार पडले.लातूर, बीड आणि अनेक ठिकाणी अटलजींच्या गाडीच्या पाठीमागे एस्कॉर्ड म्हणून प्रकाश महाजन यांनी काम केले. त्यासंबंधीची आठवण सांगत प्रकाश महाजन म्हणाले की, या काळात अटलजींना युवाहृदयसम्राट असे म्हटले जायचे. तरुणांवर तर त्यांची चटकन छाप पडत असे.

१९८६ मध्ये भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत बीडला दुष्काळी कामाची पाहणी करण्यासाठी ते आले होते. बीडच्या एका भेटीच्या वेळी त्यांची जुनी सुटकेस काही उघडेना. खटक्याची सुटकेस उघडण्यासाठी कार्यकर्ते धडपडत होते. महत्प्रयासाने एकदाची ती उघडली. त्यातून काय बाहेर पडावे? त्यात जुन्या धाटणीचा फिरकीचा पितळेचा तांब्या आणि कपडे आणि इतर छोट्या-मोठ्या वस्तू मिळाल्या. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. 

लाडसावंगीच्या दुष्काळी परिषदेत वाजपेयींचे मार्गदर्शन

माजी पंतप्रधान तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी १९८६ मध्ये लाडसावंगी येथे भेट दिल्याची माहिती ज्येष्ठ भाजप नेते दादाराव बारबैले यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी दुष्काळ परिषदेत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले होते, तसेच भाजप सदस्य नोंदणीही केल्याचे त्यांनी सांगितले. दादाराव बारबैले यांनी सांगितले की, लाडसावंगी येथे १९८६ मध्ये उन्हाळ्याचे दिवस असताना देशाचे माजी पंतप्रधान तथा ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आयोजित दुष्काळ परिषदेत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना मार्गदर्शन केले होते. याच कार्यक्रमात त्यांच्या हस्ते भाजप सदस्य नोंदणी करण्यात आली होती.यावेळी माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या भाषणाने प्रभावीत होऊन अनेक शेतकऱ्यांसह युवकांनी भाजपच्या सदस्य नोंदणीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह रामभाऊ गावंडे, दादाराव बारबैले, भीमराव पवार, रावसाहेब दांडगे, भाजप औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सूर्यभान वाढणे आदी कार्यकर्ते या कार्यक्रमाचे साक्षीदार होते.या कार्यक्रमात लाडसावंगीजवळील लामकानाचे (ता. औरंगाबाद) रहिवासी दादाराव बारबैले तसेच भीमराव पवार यांच्यासोबत वाजपेयी यांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्याचबरोबर भीमराव पवार यांना सदस्य नोंदणीची पावती वाजपेयी यांच्या हस्ते देण्यात आली होती. यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी जालना येथे रवाना झाले होते, अशी माहिती बारबैले यांनी दिली.

Web Title: Atal Bihari Vajpayee: Atalji had special affection with Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.