रुग्णवाहिका मिळाली नाही; अखेर पित्याने बसमधूनच नेला चिमुकल्याचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 11:03 AM2022-12-09T11:03:01+5:302022-12-10T10:30:13+5:30

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यलयात झाला मृत्यू

An ambulance was not found, finally the father took the body of the child from the bus itself | रुग्णवाहिका मिळाली नाही; अखेर पित्याने बसमधूनच नेला चिमुकल्याचा मृतदेह

रुग्णवाहिका मिळाली नाही; अखेर पित्याने बसमधूनच नेला चिमुकल्याचा मृतदेह

Next

(प्रातिनिधिक फोटो)

अमरावती : चिखलदरा तालुक्यातील धरमडोह येथील ४२ दिवसांचा चिमुकला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल होता. गुरुवारी या चिमुकल्याचा मृत्यू झाला. परंतु, गावी या चिमुकल्याचा मृतदेह आणण्यासाठी नागपूरहून रुग्णवाहिका किंवा शववाहिका न मिळाल्याने वडिलांना बसमधून चिमुकल्याचा मृतदेह आणण्याची वेळ आली. अमरावतीपर्यंत बसने प्रवास केल्यानंतर या ठिकाणाहून या चिमुकल्याला घेण्यासाठी टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका अमरावतीमध्ये पोहोचली होती.

काही दिवसांपूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मेळघाटचा दोन दिवसीय दौरा केला होता. यावेळी त्यांनी मेळघाटातील कुपोषण व बालमृत्यू थांबविण्यासाठी मेळघाटला खास बाब म्हणून आरोग्य सेवा पुरविणार असल्याची माहिती दिली होती. परंतु, प्रत्यक्षात आजही मेळघाटातील आदिवासी बांधवांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे.

चिखलदरा तालुक्यातील धरमडोह येथील सरीता किशोर कासदेकर यांचे ४२ दिवसांचे बाळ कुपोषित असल्याने त्याला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तब्बल १८ दिवसांपासून हा चिमुकला नागपुरात उपचार घेत होता. मात्र, गुरुवारी हे बाळ दगावले. त्यामुळे आपल्या बाळाला अमरावतीमध्ये आणण्यासाठी आई - वडिलांनी रुग्णवाहिकेची विचारपूस केली. परंतु, रुग्णवाहिका मिळाली नाही, तर खासगी रुग्णवाहिकेसाठी सात ते आठ हजार रुपये हे दाम्पत्य खर्च करू शकत नव्हते. त्यामुळे अखेर या चिमुकल्याचे वडील किशोर कासदेकर यांनी रुग्णालयातून बाळ घेतले व नागपूर येथील एसटी डेपो गाठून नागपूर ते अमरावतीपर्यंतचा प्रवास बसने केला.

यासंदर्भात आरोग्य यंत्रणेला माहिती होताच चिमुकल्याला घेण्यासाठी चिखलदरा तालुक्यातील टेब्रुसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका अमरावतीला पाठविण्यात आली. रात्री उशिरा या चिमुकल्याचा मृतदेह घेऊन कुटुंबीय गावी धरमडोह येथे पोहोचले. मेळघाटातील आरोग्याची दुरावस्था या घटनेने उघड झाली आहे.

Web Title: An ambulance was not found, finally the father took the body of the child from the bus itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.