'कसबा मनसे लढवू शकते', पुण्यातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 04:56 PM2023-01-30T16:56:12+5:302023-01-30T17:09:19+5:30

मनसे ३ फेब्रुवारी रोजी कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करणार

Kasaba MNS can fight Maharashtra Navnirman Sena in Pune by-election arena | 'कसबा मनसे लढवू शकते', पुण्यातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना

'कसबा मनसे लढवू शकते', पुण्यातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना

googlenewsNext

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.  पोटनिवडणूक येत्या २६ फेब्रुवारीला रोजी पार पडणार आहे. पुण्यातून काँग्रेसही लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे. या पोटनिवडणुकीच्या रिंगणात संभाजी ब्रिगेडने आपला उमेदवारही जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार उतरविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटलांनी पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर पुणेमनसेने 'कसबा मनसे लढवू शकते,' असा विश्वास इच्छुकांनी व्यक्त केला आहे.

पुण्यात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची याबाबत नुकतीच बैठक पार पाडली. या बैठकीत 'कसबा मनसे लढवू शकते,' असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. इच्छुकांची नावे अणि पदाधिकारी यांची भूमिका मनसे नेते अनिल शिदोरे यांच्या मार्फत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे जाणार आहे. त्यानंतर पक्ष प्रमुख राज ठाकरे हे अंतिम निर्णय घेणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी मनसे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करतील. 

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचा उमेदवार उतरविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी इच्छा पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कसबा विधानसभा हा काँग्रेससाठी पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. कॉग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, हे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत. या उमेदवारांनी नाना पटोले यांनी भेट घेतली आहे. कसबा पोटनिवडणूकीसाठी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

असा आहे इतिहास

कसबा विधानसभा मतदारसंघ मागील अनेक वर्षे भाजपच्या ताब्यात आहेत. सलग ५ वेळा तिथून भाजपचे गिरीष बापट विजयी झाले. त्यांच्याही आधी अण्णा जोशी, त्याआधी अरविंद लेले या भाजपच्याच उमेदवारांनी तिथून निवडणूक जिंकली होती. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा जोशी लोकसभेची निवडणूक जिंकली व ते खासदार झाले. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर प्रथमच पोटनिवडणूक झाली.

काय झाले होते पोटनिवडणुकीत?

काँग्रेसकडून माजी महापौर वसंत थोरात व भाजपकडून गिरीश बापट यांच्यात लढत झाली. त्यामुळे थोरात यांनी बापट यांचा पराभव केला. काँग्रेसला मिळालेला या मतदारसंघातील तो पहिलाच विजय. तो पोटनिवडणुकीत मिळाला होता. आता तोच इतिहास पुन्हा घडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच सुरू झाली आहे.

निवडणूक २०१९ ची

मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा मुक्ता टिळक यांनी भाजपकडून पराभव केला. शिंदे यांना ४७ हजार २९६ मते मिळाली. मुक्ता टिळक यांनी ७५ हजार ४९२ मते मिळवली. शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे यांना १३ हजार ९८९ मते मिळाली. मुक्ता टिळक यांचा निवडणुकीत सहज विजय झाला होता. त्याच जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे.

Web Title: Kasaba MNS can fight Maharashtra Navnirman Sena in Pune by-election arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.