भारतात एवढे तापमान वाढेल, की जगणे हाेईल मुश्कील; वर्ल्ड बँकेचा अतिगंभीर अहवाल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 12:53 PM2022-12-09T12:53:10+5:302022-12-09T13:37:36+5:30

३८ कोटी लाेक हाेतील प्रभावित

Temperature in India will rise an extent that it will become difficult to survive, 38 crore people will be affected; World Bank's report | भारतात एवढे तापमान वाढेल, की जगणे हाेईल मुश्कील; वर्ल्ड बँकेचा अतिगंभीर अहवाल  

भारतात एवढे तापमान वाढेल, की जगणे हाेईल मुश्कील; वर्ल्ड बँकेचा अतिगंभीर अहवाल  

googlenewsNext

निशांत वानखेडे

नागपूर : जागतिक तापमान वाढीच्या अनुषंगाने जागतिक बँकेने नुकताच जाहीर केलेला अहवाल भारतभारतीय उपखंडातील देशांसाठी गंभीर धाेक्याचा इशारा देणारा आहे. येत्या काही वर्षांत किंवा २०३० नंतरच भारतात वारंवार आणि अधिक काळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटा येतील. सहन करण्याच्या पलीकडे तापमान वाढेल, की लाेकांचे जगणे मुश्कील हाेईल. थेट उन्हाच्या संपर्कात येणारे लाखाे लाेक यामुळे प्रभावित हाेतील आणि देशाला काेट्यवधी डाॅलरचे नुकसान सहन करावे लागेल.

‘भारताच्या कूलिंग सेक्टरमध्ये हवामान गुंतवणूक संधी’ असे शीर्षक असलेल्या जागतिक बँकेच्या अहवालात उष्णतेची तीव्रता जगण्याच्या मर्यादेपलीकडे वाढणारे भारत हे पहिले ठिकाण ठरेल, असा धाेका अधाेरेखित केला आहे. केरळ सरकारच्या भागीदारीत जागतिक बँकेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘इंडिया क्लायमेट अँड डेव्हलपमेंट पार्टनर्स मीट’ दरम्यान हा अहवाल जारी केला जाईल.

विशेष म्हणजे ‘इंटर गव्हर्न्मेंट पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी) ने ऑगस्ट २०२१ मध्ये सहाव्या मूल्यांकन अहवालात हा धाेका अधाेरेखित करून येत्या दशकात भारतात अतितीव्र उष्ण लाटांची वारंवारता वाढण्याची भीती नमूद केली हाेती. जी-२० क्लायमेट रिस्क ॲटलसने कार्बन उत्सर्जनाचा स्तर असाच अधिक राहिल्यास २०३६ पासून भारतात उष्णतेच्या लाटा २५ पट अधिक काळ टिकून राहतील, असे म्हटले आहे. दक्षिण आशियातील तापमानवाढीच्या संदर्भात बऱ्याच हवामान शास्त्रज्ञांनीही सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

अहवालात नमूद असलेल्या गंभीर बाबी

  • येत्या दशकात भारतीय उपखंडातील तापमान वाढ सहन करण्याच्या मर्यादेच्या पलीकडे असेल.
  • भारतात ३८ कोटी लाेक म्हणजे ७५ टक्के मनुष्यबळ थेट उन्हाच्या संपर्कात येणारी नाेकरी करतात. त्यांच्यावर प्रभाव पडणार आहे.
  • २०३० नंतर उष्णतेच्या कारणाने भारतातील ८ कोटी जागतिक नाेकऱ्यांपैकी ३.४ कोटी नाेकऱ्यांवर प्रभाव पडेल. त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर हाेईल.
  • दक्षिण आशियायी देशातील जड श्रमांवर उष्णतेचा प्रभाव पडताे व यामुळे दरवर्षी १०१ अब्ज तासांपेक्षा अधिक वेळ वाया जाताे.
  • मॅकिन्से ॲन्ड कंपनी या जागतिक व्यवस्थापन संस्थेच्या अहवालानुसार येत्या दशकाच्या अखेरपर्यंत वाढत्या उष्णतेच्या प्रभावाने गमावलेल्या श्रमांमुळे भारताच्या जीडीपीच्या ४.५ टक्के अंदाजे १५० ते २५० अब्ज अमेरिकन डाॅलरचे नुकसान हाेण्याचा धाेका आहे.
  • भारताची अन्न सुरक्षा व सार्वजनिक आराेग्य सुविधा कोल्ड चेन नेटवर्कवर अवलंबून असेल. तापमान वाढीमुळे शीतसाखळी खंडित हाेऊन ताज्या अन्न उत्पादनाचे १३ अब्ज डाॅलरपेक्षा अधिकचे नुकसान हाेईल.
  • भारताने तापमान-संवेदनशील वैद्यकीय उत्पादने आणि २५ टक्के लस शीतसाखळी खंडित झाल्याने गमावल्या व यामुळे ३१.३ कोटी डॉलर्सचे नुकसान झाले.
  • भारतातील केवळ ८ टक्के कुटुंबांकडे एअर कंडिशनिंग युनिट्स आहेत. ४० टक्के कुटुंबाकडे पंखे, कूलरसारखे उपकरण आहे.
  • अनेक गरीब आणि उपेक्षित लाेक अपर्याप्त कूलिंग सुविधा, गरम आणि गर्दीच्या घरात राहतात. अति उष्णतेच्या लाटांमध्ये त्यांची सुरक्षा धाेक्यात येईल.

विदर्भातील अनेक शहरे यावर्षी जागतिक क्रमवारीत

याच वर्षी भारताने तीव्र उष्णतेच्या लाटा सहन केल्या आहेत. विदर्भातीलच अनेक शहरांचे तापमान जागतिक क्रमवारीत पहिल्या दहामध्ये आले हाेते. नागपूर आणि राजधानी दिल्लीचे तापमान ४६ अंशांवर गेले हाेते. यावर्षी पुराने महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातले, ज्यामध्ये हजाराे लाेकांनी प्राण गमावले व लाखाे विस्थापित झाले. काेट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले.

Web Title: Temperature in India will rise an extent that it will become difficult to survive, 38 crore people will be affected; World Bank's report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.