यवतमाळ जिल्ह्यात अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:27 IST2018-03-10T14:26:14+5:302018-03-10T14:27:20+5:30
महागाव तालुक्यातील बिजोरा येथील एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महागाव तालुक्यातील बिजोरा येथील एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
देवीदास नागोराव खंदारे (२०) आणि संतोषी वसंता मुरमुरे (१६) अशी मृतांची नावे आहे. संतोषी येथील एका विद्यालयात नववीत शिकत होती. आज शनिवार असल्याने ती सकाळी शाळेत आली. काही वेळानंतर ती शाळेतून निघून गेली. दरम्यान, सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास शाळेतील एक विद्यार्थिनी शाळेच्या मागे गेली. तिला शाळेजवळील नाल्यापलिकडील एका झाडाला देवीदास लटकलेल्या अवस्थेत आढळला. सदर विद्यार्थिनी घाबरत शाळेत पोहोचली. तिने शिक्षकांना याबाबत माहिती दिली.
यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी घटनास्थळ गाठले. तेथे देवीदास खंदारे याच्या पायाशी संतोषी मुरमुरे निपचित पडून होती. लगेच महागाव पोलिसांना माहिती देण्यात आली. महागावचे ठाणेदार डी.के. राठोड, एपीआय एस. पावरा, पीएसआय कैलास भगत आणि पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना प्राथमिक केंद्रात रवाना केले. घटनास्थळी उंदीर मारण्याचे औषध आढळून आले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. मृत देवीदास खंदारे पाचवीपर्यंत शिकलेला असून तो वडिलांना शेतीकामात मदत करीत होता.