होय, आम्ही शेतकरी आहोत, अतिरेकी नाही; कंगना रणौतवर शेतकरी विधवा भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 18:39 IST2021-02-04T18:39:23+5:302021-02-04T18:39:38+5:30
कंगना रणौतच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली.

होय, आम्ही शेतकरी आहोत, अतिरेकी नाही; कंगना रणौतवर शेतकरी विधवा भडकल्या
यवतमाळ : दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना आतंकवादी संबोधल्याचा निषेध शेतकरी विधवांनी केला. पांढरकवडा येथे शेतकरी विधवा महिलांनी अभिनेत्री कंगना रणौतचा पुतळा जाळत आपला संताप व्यक्त केला. यापुढे कंगना रणौतच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली.
होय, आम्ही शेतकरी आहोत, पण आम्ही अतिरेकी नाही, हे आंदोलन पांढरकवडा येथे करण्यात आले. पांढरकवडा येथील शेतकरी विधवा प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भावना अधिक तीव्र आहेत. कंगना रणौतच्या बेताल वक्तव्याचा महिलांनी निषेध केला.
यावेळी शेतकरी नेते किशोर तिवारी, समाजसेविका स्मिता तिवारी, शेतकरी विधवा भारती पवार, पाैर्णिमा कोपुलवार, कविता सिद्म, लक्ष्मी गिरवार, राम थमके, वंदना मोहर्ले, रेखा गुरनाळे, अपर्णा मालिकर, योगिता चाैधरी यांच्यासह माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी, अंकित नैताम, सुनील राऊत, सुरेश तलमले, नीलेश जयस्वाल, मनोज चव्हाण, संदीप जाजुलवार, चंदन जैनकर, प्रदीप कोसरे, बबलू धुर्वे, आशुतोष अंबाडे आदी उपस्थित होते.
अत्याचारी शेतकरी कायद्यांच्या विरोधात ६ फेब्रुवारीला विविध शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. या बंदमध्ये महाराष्ट्रात शिवसेनेसह अनेक राजकीय तसेच सामाजिक संघटना सहभागी होत आहेत. या दिवशी दुपारी १२ ते ३ या दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन द्यावे, असे आवाहन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले आहे.