यवतमाळचे तापमान अवघे ६.४ अंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 22:01 IST2019-01-29T22:00:46+5:302019-01-29T22:01:56+5:30
हिमवादळाच्या तांडवाचा जगभरात कहर सुरू आहे. उत्तरेकडे त्याचा प्रकोप सुरू आहे. कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्या गारठयाची लाट दक्षीण भारतापर्यंत पोहोचली आहे. विदर्भालाही या लाटेचा मोठा फटका बसला आहे.

यवतमाळचे तापमान अवघे ६.४ अंश
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हिमवादळाच्या तांडवाचा जगभरात कहर सुरू आहे. उत्तरेकडे त्याचा प्रकोप सुरू आहे. कश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्या गारठयाची लाट दक्षीण भारतापर्यंत पोहोचली आहे. विदर्भालाही या लाटेचा मोठा फटका बसला आहे. हवामान अभ्यासकांनी गत ५० वर्षातील थंडीचा सर्वात मोठा मुक्काम असल्याचे मत नोंदविले. ऋतूचक्र बिघडण्याचा धोका वाढला असून याचा फटका शेतीला बसणार आहे.
वातावरण बदलामुळे उत्तरेकडील बर्फ वादळ मध्य भारतापर्यंत पोहचले आहे. यामुळे गत महिनाभरापासून थंडीचा जोर जिल्ह्यात कायम आहे. गत ५० वर्षात प्रथमच असे घडले. हा प्रकार निसर्गचक्र प्रभावित झाल्याचेच संकेत आहे. पूर्वी जानेवारी मध्यापर्यंत थंडीचा जोर कायम राहत होता. आता १० फेब्रुवारीपर्यंत थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिमवादळामुळे उष्ण वारे आणि थंड वारे विदर्भात एकमेकाला भिडणार आहेत. यातून वारंवार कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्रावर प्रामुख्याने जाणवणार आहे. यामुळे गारपिटीसारख्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागण्याचा धोका वाढला आहे.
पूर्वी मार्च अखेरीस गारपीट आणि पाऊस येत होता. आता हिमवादळामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अशा घटना घडत आहे. जंगल क्षेत्र घटल्याचा हा परिणाम आहे. यातून विविध क्षेत्रामध्ये विपरित परिणाम होण्याची चिन्हे आहेत.
शेतीचा लागवड कालावधी लांबणार
तापमानातील सततच्या बदलाने भुईमुगाचे क्षेत्र बाद होण्याची चिन्हे आहेत. तर गहू आणि हरभरा लागवडीचा कालावधी लांबला आहे. यावर्षी तर शेतकऱ्यांनी पºहाटी उपटून गव्हाचीच मोठ्या प्रमाणात लागवड केली. निसर्ग प्रकोपावर मात करणारे पीक शेतकऱ्यांना निवडावे लागणार आहे.
यावर्षीचे सर्वात कमी तापमान
यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी तापमानाचा पारा १०.४ अंशावर होता. मंगळवारी हे तापमान निम्म्यावर आले. ६.४ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद करण्यात आली. यावर्षीचे सर्वात कमी तापमान मंगळवारी नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्वात कमी तापमान यवतमाळात नोंदविण्यात आले आहे.
निसर्गाच्या असमतोलाने तापमानात बदल होत आहे. यामुळे थंडीचा मुक्काम वाढला. उन्हाचा पाराही यावर्षी वर चढण्याची चिन्हे आहेत. तापमान बदलाचा हा ग्लोबल इफेक्ट स्थानिक पातळीवर झाला आहे. यामुळे गारपीट होण्याचा धोका कायम आहे.
- सुरेश चोपने,
हवामान अभ्यासक, चंद्रपूर