यवतमाळ शिवसेना पदाधिकारी व माजी नगरसेवकाचा राजीनामा; पत्रासोबत शिवबंधनही पाठवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 17:18 IST2022-04-29T16:17:27+5:302022-04-29T17:18:44+5:30
हुकुमशाहीच्या आदेशाचे पालन न केल्यानं माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरटे यांचा आरोप.

यवतमाळ शिवसेना पदाधिकारी व माजी नगरसेवकाचा राजीनामा; पत्रासोबत शिवबंधनही पाठवलं
यवतमाळ शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक रवी तरटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपुर्द केला आहे. शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या मनमर्जीला आणि कार्यपद्धतीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी जिल्हाप्रमुख पराग पिंपळे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला, यासोबतच त्यांनी आपलं शिवबंधनही परत दिलं आहे.
यापूर्वी तरटे यांनी संजय राठोड यांच्याजागी आपल्याला मंत्री करा अशी मागणी केली होती. तेव्हापासून ते चर्चेत आले होते. “मी गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेचा निष्ठावान आणि सत्याची बाजू घेऊन स्पष्ट बोलणारा सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता होतो. पक्षाची विविध पदे मी यापूर्वी मोठ्या जबाबदारीनं पार पाडली आहेत. २०१६ च्या नगर पालिका निवडणुकीत जनतेनं मला नगरसेवक म्हणून निवडून दिले. गेली पाच वर्षे मी लोकांची आणि जनतेची कामं १०० टक्के करण्याचा प्रयत्न केला. ५ वर्षांचे घाणेरडे राजकारण, तसंच मला पक्षश्रेष्ठींकडून चुकीची वागणूक देण्यात आली,” असा आरोप रवी तरटे यांनी पत्राद्वारे केला आहे.
हुकुमशाहीच्या आदेशाचे पालन न केल्यानं माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसंच मतदार संघाचे प्रमुख आमदार यांच्या विरोधात आवाज उठवल्यानं मला त्यांनी पक्षात डावलल्याचा प्रयत्न सुरू ठेवला. पक्षातील वरिष्ठ मंडळींना कंटाळून मी यापुढे शिवसेनेचा पदाधिकारी आणि शिवसैनिक म्हणून न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी माझा राजीनामा सोपवत आहे आणि मतदार संघाचे आमदार संजय राठोड यांनी तो स्वीकारावा अशी विनंती करत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.