Yavatmal Crime: शहरालगतच्या वाघदरा ग्रामपंचायत हद्दीत एका बीअर बारच्या मागे मृतदेह आढळून आला. या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जखमा आढळून आल्याने त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचा अंदाज आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. देवराव गुंजेकर (रा.नवीन लालगुडा) असे या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी शालू राजू लष्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. देवराव गुंजेकर हा गल्लीबोळात फिरून भंगार वेचण्याचं काम करायचा. तो दारूच्या प्रचंड आहारी गेल्याचे सांगण्यात येते.
त्याच्यासोबत त्याचा परिवार नव्हता. पण, त्याची भाची त्याच्यासोबत राहत असल्याचे समजते. तो वेगवेगळ्या ठिकाणी किरायाच्या घरात राहायचा. दोन महिन्यांपूर्वी तो वाघदरा येथून नवीन लालगुडा येथे एका किरायाच्या घरात राहायला गेला होता.
सोमवारी (दि. १८) सकाळी त्याचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना चारगाव चौकी मार्गावरील बीअर बारच्या मागे तो रक्ताच्या थारोळ्यात दिसला. नंतर ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली.
खुनाचे कारण गुलदस्त्यात
एका भंगार वेचणाऱ्याचा खून करण्याइतपत असा कोणता टोकाचा वाद झाला असावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच विवस्त्र अवस्थेत या व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.