यवतमाळ पालिकेत भाजपसोबत प्रहार, बसप अन् अपक्षाची आघाडी; शिंदेसेनेला सत्तेपासून ठेवले दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:52 IST2025-12-30T18:50:46+5:302025-12-30T18:52:22+5:30
Yavatmal : जिल्हा मुख्यालय असलेल्या नगरपरिषदेत भाजपला एकहाती बहुमत मिळाले. नगराध्यक्षही भाजपकडे आहे. अशाही स्थितीत भाजपने यवतमाळ शहर विकास आघाडी स्थापन करून प्रहार, बसप आणि अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन तशी नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Yavatmal Municipality: BJP, BSP and independents join hands; Shinde Sena kept away from power
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मुख्यालय असलेल्या नगरपरिषदेत भाजपला एकहाती बहुमत मिळाले. नगराध्यक्षही भाजपकडे आहे. अशाही स्थितीत भाजपने यवतमाळ शहर विकास आघाडी स्थापन करून प्रहार, बसप आणि अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन तशी नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या आघाडीचे गटनेते म्हणून भाजपमधील ज्येष्ठ नगरसेवक नितीन गिरी यांना निवडण्यात आले आहे.
नगरपरिषदेत भाजपकडे सर्वाधिक २८ नगरसेवक, नगराध्यक्ष असे २९ चे संख्याबळ आहे. आता आघाडीमध्ये प्रहारचे दोन सदस्य, बसप आणि अपक्ष प्रत्येकी एक असे चार सदस्यांचे समर्थन घेऊन आघाडी तयार केली आहे. तर काँग्रेसकडे १५ नगरसेवक आहेत. राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेकडे सात नगरसेवक आहेत. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे तीन आणि एमआयएमचा एक सदस्य आहे. आता संख्याबळात ३२ नगरसेवक विरुद्ध २६ असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातही नगराध्यक्ष भाजपचा असल्याने भाजपलाच त्यांचे मत मिळणार आहे. त्यामुळे सभागृहातील कुठलाही ठराव ३३ विरुद्ध २६ अशा मतांनी पारित होणार आहे.
यवतमाळ नगरपरिषदेत महायुतीतील शिंदेसेनेने स्वतंत्र लढत दिली. निवडणुकीनंतर भाजप व शिंदेसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षात सत्तेबाबतचे गणित जुळले नाही. मोठे संख्याबळ असलेल्या भाजपला सत्तेत भागीदार नको, बिनशर्त सोबत येणाऱ्यांनाच घ्यायचे असे ठरल्याने प्रहार, बसप व अपक्ष यांची साथ लाभली. यातील अपक्ष उमेदवार भारत ब्राह्मणकर हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविली. भाजपचे शहर महामंत्री म्हणून ते कार्यरत होते. निवडणुकीनंतर ब्राह्मणकर भाजपसोबतच जाणार हे स्पष्ट होते. आता ३३ चे संख्याबळ असल्याने भाजपला निर्णय प्रक्रियेत कुठेही अडथळा येणार नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
भाजप जिल्हा कार्यालयात सोमवारी दुपारी आघाडी व गटनेता निवडीची प्रक्रिया झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चव्हाण, नगराध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके, महामंत्री राजू पडगीलवार, योगेश पाटील, शंतनू शेटे, रेखा कोठेकर यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व आघाडीतील नगरसेवक उपस्थित होते.
स्वीकृत सदस्यांसाठी रस्सीखेच
भाजपच्या वाट्याला पाच पैकी तीन स्वीकृत सदस्य येणार आहेत. त्यामुळे आता नगरपरिषदेत जाण्यासाठी दोन पराभूतांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे पदाधिकारी असलेल्या या पराभूतांकडून स्थानिक नेत्यावर दबाव आणला जात आहे. तर उमेदवारीच्या वाटाघाटीत ज्यांनी नेत्याच्या शब्दावरून माघार घेतली, त्यांनाही स्वीकृत सदस्य म्हणून जायचे आहे. एकूणच तीन जागेसाठी सहा इच्छुक प्रयत्न करत आहे.
तर २ जानेवारी रोजी पहिली सभा
नगरपरिषदेतील पहिली सभा व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम शासन स्तरावरून प्राप्त झालेला नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शन मागविले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत यावर कुठलीही सूचना मिळाली नाही. नगरपरिषदेतील राजकीय पक्षांकडून सत्ता स्थापनेसाठी गट, आघाडीची नोंदणी केली जात आहे. गटनेत्यांची निवडही करण्यात येत आहे. शासन स्तरावरून मार्गदर्शन आल्यास २ जानेवारी रोजी पहिली सभा राहू शकते. यामध्ये उपाध्यक्ष निवड व स्वीकृत सदस्य निवडसुद्धा करण्यात येणार आहे.
५८ पैकी ३२ नगरसेवक व एक नगराध्यक्ष आघाडीत
भाजपने सत्ता स्थापन करण्यापूर्वी शहर विकास आघाडी बनवून प्रहार, अपक्ष व बसप अशा चार नगरसेवकांना सोबत घेतले आहेत. त्याची नोंदही केली आहे.