मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 19:25 IST2025-04-28T19:25:35+5:302025-04-28T19:25:35+5:30
UPSC: यवतमाळमध्ये मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वागद ईजारा येथून धक्कादायक माहिती समोर आली. मुलगी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळताच तिच्या वडिलांचा आनंद गगनाला भिडला. परंतु, हा आनंद दुसऱ्या मिनिटाला दु:खात बदलला. आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पुसद पंचायत समितीचे निवृत्त विस्तार अधिकारी प्रल्हाद खंदारे यांची कन्या मोहीनी खंदारे हिने नुकतीच पार पडलेल्या यूपीएससी परीक्षेत बाजी मारली. त्यामुळे तिच्या वडिलांसह कुटुंब, शेजारी, नातेवाईक आणि हितचिंतक अभिमानास्पद क्षणाचे स्मरण करण्यासाठी जमले. मोहिनीच्या यशाचा आनंद साजरा करताना सर्वजण मुलीचे वडील प्रल्हाद खंदारे यांचे कौतुक करत होते. मोहिनीच्या यशात वडील प्रल्हाद यांचा सिंहाचा वाटा होता. मोहिनीच्या यशामुळे त्यांचे छोटेसे गाव राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले. यामुळे प्रल्हाद हे खूप आनंदी होते.
दरम्यान, मुलीच्या यशाचा आनंद साजरा करताना प्रल्हाद अचानक जमिनीवर कोसळले. त्यानंतर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेले. पंरतु, तिथे, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.