मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंच्या घरापुढे भोंगे वाजविणार; यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जत्था मुंबईकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 18:35 IST2022-05-03T18:19:04+5:302022-05-03T18:35:09+5:30
५० शेतकऱ्यांचा जत्था मुंबईला रवाना झाला असून ४ मे रोजी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर राजकीय भोंगे बंद करण्यासाठी महाआरती करणार आहे.

मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंच्या घरापुढे भोंगे वाजविणार; यवतमाळच्या शेतकऱ्यांचा जत्था मुंबईकडे रवाना
यवतमाळ : राजकीय पक्ष भोंगे वाजविण्यात व्यस्त आहे. जनसामान्यांच्या प्रश्नाकडे त्यांची डोळेझाक झाली आहे. समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही नेत्यांनी केले आहे. मात्र, यात सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक होत आहे. या सर्वांची आठवण करून देण्याच्या उद्देशातून जिल्ह्यातील शेतकरी मुंबईला रवाना झाले आहेत. हे शेतकरी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या घरापुढे भोंगे वाजविणार आहेत.
शेतकरी नेते विनायक पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली होती. १ मेपासून शेतकऱ्यांना दररोज दिवसा १० तास वीज देण्यात यावी, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे बिल एफआरपीप्रमाणे एक हप्त्यात द्यावे, फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावे, आमदार-खासदारांचे पेन्शन बंद करावे, गायीच्या दुधाला प्रति लीटर ४० रुपये भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी मुंबईत मंत्रालयापुढे आंदोलन करणार आहेत.
याशिवाय जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे राजकीय नेते यांना देखील आवर घालण्यासाठी त्यांच्या घरापुढे जाऊन शेतकरी भोंगे वाजविणार आहेत. या आंदोलनात वारकरी संघटनेचे नेते सिकंदर शाह, बाळू चव्हाण, बाळू राठोड, बाळू विरुटकार यांच्यासह ५० शेतकऱ्यांचा जत्था मुंबईला रवाना झाला असून ४ मे रोजी मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर राजकीय भोंगे बंद करण्यासाठी महाआरती करणार आहे. त्यांच्यासह भजनी मंडळ देखील सोबत आहे.