Yavatmal Crime : ' मी अपयशी ठरलो....' नोकरी मिळत नसल्याने तरुण इंजिनिअरने केली आत्महत्या; चिट्ठीत आले दयनीय वास्तव समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:36 IST2026-04-01T16:25:10+5:302026-04-01T16:36:46+5:30
Yavatmal : बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील बीई मेकॅनिकल असलेल्या युवकाने नोकरी मिळत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Yavatmal Crime : 'I failed...' Young engineer commits suicide after not getting a job; Letter reveals pathetic reality
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील बीई मेकॅनिकल असलेल्या युवकाने नोकरी मिळत नसल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ३१ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. यामुळे रोजमजुरी करणाऱ्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे.
नचिकेत संजय शिवरकर (२६) रा. विसावा कॉलनी पिंपळगाव रोड यवतमाळ असे मृत अभियंत्याचे नाव आहे. त्याने बीई मेकॅनिकलची पदवी घेतल्यानंतर पुणे येथे काही दिवस जॉब केला. नंतर तो तेथून यवतमाळ येथे घरी परत आला. नवीन जॉबचा तो मागील सहा महिन्यांपासून शोध घेत होता, त्याला यात सातत्याने अपयश आले. ही बाब त्याने कुटुंबियांच्या निर्दशनास येऊ दिली नाही.
सोमवारी दि. ३० मार्च रोजी रात्री त्याने वडिलांसोबत जेवण केले. नंतर वडील घराबाहेर शतपावली करण्यास निघून गेले. नचिकेत हा त्याच्या खोलीत गेला, मंगळवारी दि. ३१ मार्च रोजी सकाळी नचिकेतचा फोन सारखा वाजत होता, त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने वडिलांनी खोलीत जावून बघितले असता नचिकेतने नायलॉन दोरीने गळफास लावल्याचे दिसत होते. हे दृश्य पाहून त्यांनी आरडओरडा केला. शेजारी जमा झाले, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
मी अपयशी ठरलो....
नचिकेतला खाली काढले असता त्याच्या पँटच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात त्याने मी अपयशी झालो, माझ्या स्वतःतच कमी आहे, माझ्या मृत्यूला कोणीही कारणीभूत नाही, असे लिहून ठेवले होते. नोकरी मिळत नाही या तणावातच नचिकेतने आत्महत्या केल्याची फिर्यादीत त्याचे वडील संजय शिवरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी कलम १९४ बीएनएसनुसार अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.