यवतमाळ जिल्हा परिषदेत पुन्हा ‘महिला राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:00 AM2019-11-20T06:00:00+5:302019-11-20T06:00:05+5:30

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मुंबईत मंगळवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ‘खुल्या प्रवर्गातील महिला’ यासाठी निघाले आहेत. हे आरक्षण जाहीर होताच जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचे नवे समीकरण कसे राहील यावर चर्चांचे फड रंगताना पहायला मिळाले. दिवसभर जिल्हा परिषदेमध्ये या आरक्षणाची व त्याअनुषंगाने होणाऱ्या संभाव्य राजकीय घडामोडींची चर्चा होती.

'Women's Raj' again at Yavatmal Zilla Parishad | यवतमाळ जिल्हा परिषदेत पुन्हा ‘महिला राज’

यवतमाळ जिल्हा परिषदेत पुन्हा ‘महिला राज’

Next
ठळक मुद्देअध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर : खुल्या प्रवर्गातील महिलेला संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा ‘महिला राज’ पहायला मिळणार आहे. कारण अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. या आरक्षणाने पुरुष मंडळींचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यांना आता उपाध्यक्ष व सभापती पदावर समाधान मानावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मुंबईत मंगळवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ‘खुल्या प्रवर्गातील महिला’ यासाठी निघाले आहेत. हे आरक्षण जाहीर होताच जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचे नवे समीकरण कसे राहील यावर चर्चांचे फड रंगताना पहायला मिळाले. दिवसभर जिल्हा परिषदेमध्ये या आरक्षणाची व त्याअनुषंगाने होणाऱ्या संभाव्य राजकीय घडामोडींची चर्चा होती. यंत्रणेकडून वेगवेगळे आराखडे बांधले जात होते. जिल्हा परिषदेच्या आगामी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवर राज्यातील सत्ता समीकरणाचे सावट राहील एवढे निश्चित.
जिल्हा परिषदेमध्ये सध्या काँग्रेसचे अध्यक्ष व भाजपचे उपाध्यक्ष आहे. सुरुवातीची दोन वर्षे सर्वाधिक जागा असूनही शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत बसून सत्तेचे गणित जुळविले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व भाजपने शिवसेनेला सोबत घेत राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवले. आता नवे समीकरण नेमके कसे राहणार हे वेळच सांगेल. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी पुढील महिन्यात तो होण्याची दाट शक्यता आहे. १५ डिसेंबरपूर्वी नवा अध्यक्ष निवडला जाईल असे मानले जाते.
राज्यातील राजकीय समीकरणावर जिल्हा परिषदेचे समीकरण अवलंबून राहण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या टर्ममध्ये भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले. त्याचा हिशेब आता शिवसेनेकडून चुकता करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप-सेना एकत्र बसली तरी सत्तेसाठी लागणारा जादुई आकडा कसा जुळविणार हा प्रश्नच आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्टÑवादी असे सत्तेचे समीकरण बसल्यास यवतमाळ जिल्हा परिषदेतही तोच पॅटर्न राहण्याची व भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी खेळली जाऊ शकते. सर्वाधिक जागा असल्याने शिवसेना अध्यक्षपदावर दावा करू शकते. भाऊबंदकीसाठी उपाध्यक्ष पदावर सेनेने जोर दिल्यास अध्यक्षपद अन्य पक्षाला देऊन जास्तीचे सभापतीपद घेतले जाऊ शकते. शिवसेनेने अध्यक्षपदाचा आग्रह धरल्यास हे पद सेना नेते संजय राठोड आपल्या दिग्रस विधानसभा मतदारसंघात खेचून नेण्यासाठी प्रयत्नरत राहू शकतात. तसे झाल्यास सध्या शिक्षण सभापती असलेल्या कालिंदा पवार यांना अध्यक्षपदावर बढती दिली जाऊ शकते. शिवाय दिग्रस तालुक्यातील रुख्मिणी उकंडे यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. अध्यक्षपद बंजारा समाजाकडे कायम ठेवायचे झाल्यास शिवसेनेकडून उमरखेड तालुक्यातील रेखा आडे व नेर तालुक्यातील वर्षा राठोड यांचे नाव पुढे येते. भाजपकडून अध्यक्षपदासाठी वणी तालुक्यातील मंगला पावडे, यवतमाळ तालुक्यातील रेणू शिंदे यांची नावे चर्चेत आहे. संजय राठोड प्रमाणे मदन येरावार यांनीही अध्यक्षपद आपल्या मतदारसंघात ठेवण्याचा आग्रह धरल्यास रेणू शिंदे यांना लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसकडून मारेगाव तालुक्यातील अरुणा खंडाळकर, आर्णी तालुक्यातील स्वाती येंडे यांची नावे आघाडीवर आहेत. अरुणा खंडाळकर ज्येष्ठ व अनुभवी असल्याने त्यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यांच्यासाठी पक्षात आग्रह धरणार कोण हा प्रश्न आहे. राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी तीन महिला दावेदार असून त्या पुसद, उमरखेड विभागातील आहे.
नवा अध्यक्ष सुशिक्षित असावा यावर भर राहण्याची शक्यता आहे. सध्या आहे तसे सत्तेचे समीकरण बसल्यास काँग्रेसमध्ये पुन्हा माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांचे वजन चालण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा परिषदेचे सर्वाधिक सदस्य त्यांनी निवडून आणले आहेत. एखादवेळी विद्यमान अध्यक्षांना रिपीट करा अशी मागणीही त्यांच्याकडे लावून धरली जाऊ शकते. परंतु सर्वांनाच संधी मिळावी या न्यायानुसार रिपीटची शक्यता नसल्याचे जिल्हा परिषदेच्या राजकीय गोटात बोलले जाते.

या महिलांमधून होऊ शकतो नवा अध्यक्ष
भाजप : सुमित्रा कठाळे, प्रज्ञा भूमकाळे, उषा भोयर, प्रीती काकडे, मंगला पावडे, मीनाक्षी बोलेनवार, सुनिता मानकर, सरिता जाधव, रेणू शिंदे, रंजना घाडगे.
काँग्रेस : जयश्री पोटे, अरुणा पवार, वैशाली राठोड, सुचरिता पाटील, किरण मोघे, माधुरी आडे, स्वाती येंडे, पूर्नरथा भडंगे, सविता पोटेवाड
शिवसेना : पावनी कल्यमवार, कविता इंगळे, वर्षा राठोड, कालिंदा पवार, अश्वीनी कुरसिंगे, राधा थरकडे, रुख्मिणी उकंडे, रेखा आडे,
राष्ट्रवादी काँग्रेस : विमल आडे, ज्योती चिरमाडे, वर्षा भवरे,
अपक्ष : नंदिनी दरणे.

Web Title: 'Women's Raj' again at Yavatmal Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.