चला गेटच्या बाहेर व्हा.. तक्रार घेऊन गेलेल्या महिला सरपंचांना ठाणेदाराने भरला दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 14:56 IST2022-01-16T14:41:18+5:302022-01-16T14:56:02+5:30
ठाणेदारांनी यांनी आपल्याला चला गेटच्या बाहेर व्हा, असा दम भरल्याचा आरोप महिला सरपंचांनी केला आहे. आम्हाला काय सुरू करायचे व काय बंद ठेवायचे, हे कळते, तुम्ही सरपंच आहात, गावचे बघा, असा सल्लाही ठाणेदारांनी दिल्याचे आडे यांनी तक्रारीत नमूद केले.

चला गेटच्या बाहेर व्हा.. तक्रार घेऊन गेलेल्या महिला सरपंचांना ठाणेदाराने भरला दम
यवतमाळ : दराटी पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेलेल्या महिला सरपंचांना ठाणेदारांनी चक्क चला गेटच्या बाहेर चला म्हणत दम भरला. आता महिला सरपंचाने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून ठाणेदारांच्या बदलीची मागणी केली.
उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील दराटी पोलीस ठाण्यांतर्गत अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याचा आरोप करीत दराटीच्या महिला सरपंच सुनीता आडे पोलीस ठाण्यात धडकल्या. त्यांनी दारूसह जुगार, मटका, अवैध जनावरांची वाढती तस्करी, गांजा तस्करी बंद करण्याची मागणी ठाणेदारांकडे केली. त्यांची मागणी ऐकताच ठाणेदार भडकले. त्यांनी चक्क आपल्याला पोलीस ठाण्याच्या बाहेर काढून अवमान केल्याचा आरोप सरपंच आडे यांनी केला आहे.
सरपंच सुनीता आडे यांनी आता थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवदेन देउन बंदी भागातील अनेक गावांमध्ये सुरू असलेले अवैध धंदे, जुगार, दारू विक्री, मटका बंद करण्याची मागणी केली. तसेच ठाणेदारांच्या बदलीची ही मागणी केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी गावातील महिलांनी अवैध धंदे बंद करावे म्हणून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यामुळे सरपंच आडे यांनी शिपायामार्फत ठाणेदारांकडे निवेदन पाठविले होते. मात्र, ठाणेदारांनी मी शिपायाच्या हाताने तक्रार अर्ज घेत नाही, सरपंचांना पाठवा, असे म्हटल्याचा आरोपही आडे यांनी केला. त्यामुळेच आपण स्वत: दराटी पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
ठाणेदार भरत चापाईतकर यांनी आपल्याला चला गेटच्या बाहेर व्हा, असा दम भरल्याचा त्यांचा आरोप आहे. आम्हाला काय सुरू करायचे व काय बंद ठेवायचे, हे कळते, तुम्ही सरपंच आहात, गावचे बघा, असा सल्लाही ठाणेदारांनी दिल्याचे आडे यांनी तक्रारीत नमूद केले. सरपंचांनी मुलास बोलाविले असता त्यालाही खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची ठाणेदारांनी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बदली न झाल्यास उपोषण
सरपंच सुनीता आडे यांच्या मुलाने हा सर्व प्रकार आमदार संजय राठाेड यांच्या कानी घातला. त्यानंतर आमदार राठोड यांनी फोनद्वारे ठाणेदारांना समज दिली. तरीही ठाणेदारांनी गेटबाहेर येऊन खुर्चीवर बसत तब्बल एक तास ताटकळत उभे ठेवून माझा अवमान केला, असा आराेप सरपंच सुनीता आडे यांनी केला. आता पोलीस अधीक्षकांनीच ठाणेदारांची बदली करावी, अन्यथा २५ जानेवारीला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.