पत्नी फवारणीसाठी पाणी आणायला गेली अन् त्याने कीटकनाशक घेऊन जीवन संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 11:30 IST2023-09-14T11:26:23+5:302023-09-14T11:30:04+5:30

परिसरात हळहळ व्यक्त

wife went to fetch water for spraying, farmer committed suicide consuming pesticide | पत्नी फवारणीसाठी पाणी आणायला गेली अन् त्याने कीटकनाशक घेऊन जीवन संपविले

पत्नी फवारणीसाठी पाणी आणायला गेली अन् त्याने कीटकनाशक घेऊन जीवन संपविले

मारेगाव (यवतमाळ) : पोळ्यापूर्वी कपाशीवर फवारणी करण्यासाठी हिवरी येथील पती-पत्नी शेतात गेले. पत्नी फवारणीसाठी पाणी आणायला गेली अन् इकडे त्याने पंपात टाकण्याचे कीटकनाशक पोटात टाकून आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना हिवरी येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवीण शायनिक काळे (३५) रा. हिवरी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो बुधवारी सकाळी पत्नीसह कपाशी पिकावर कीटकनाशक फवारणी करायला गेला होता. फवारणीसाठी लागणारे पाणी आणून द्यायला पत्नीही सोबत गेली होती. सकाळी ८.३० वाजेदरम्यान पत्नी बाजूच्या शेतातील विहिरीवरून पाणी आणायला गेली. पत्नी दूर जाताच या तरुणाने पंपात टाकायचे कीटकनाशक प्राशन केले.

पत्नी पाणी घेऊन परत आल्यावर तिला हा प्रकार लक्षात आला. तिने आरडाओरड केल्याने शेजारील शेतातील नागरिक धावून आले. त्याला उपचारासाठी मारेगाव येथे हलविण्यात आले; परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई-वडील व बराच मोठा परिवार आहे. सध्या पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, आत्महत्या का केली याचा तपास सुरू आहे.

Web Title: wife went to fetch water for spraying, farmer committed suicide consuming pesticide