नकळत्या वयात मुली बोहल्यावर; गेल्या पाच वर्षात दीडशे बालविवाहांचे प्रयत्न, यंदा सर्वाधिक 

By अविनाश साबापुरे | Published: May 19, 2024 04:46 PM2024-05-19T16:46:21+5:302024-05-19T16:47:31+5:30

गेल्या पाच वर्षांचा अदमास घेतल्यास यंदा जिल्ह्यात बालविवाहांचे सर्वाधिक प्रयत्न झाले.

When girls are born at an unknown age In the last five years, one and a half hundred child marriages have been attempted, this year is the highest | नकळत्या वयात मुली बोहल्यावर; गेल्या पाच वर्षात दीडशे बालविवाहांचे प्रयत्न, यंदा सर्वाधिक 

नकळत्या वयात मुली बोहल्यावर; गेल्या पाच वर्षात दीडशे बालविवाहांचे प्रयत्न, यंदा सर्वाधिक 

यवतमाळ: भले काय बुरे काय, काहीच कळत नाही... अन् अशा नादान वयात कोवळ्या मुलींना लग्नाच्या बोहल्यावर चढविण्याचे प्रयत्न होत आहेत. गेल्या पाच वर्षांचा अदमास घेतल्यास यंदा जिल्ह्यात बालविवाहांचे सर्वाधिक प्रयत्न झाले. मागील काही वर्षात बालविवाहांच्या २० ते ३० घटना पुढे आल्या. परंतु २०२४ मध्ये अवघ्या पाच महिन्यांतच तब्बल ३३ बालविवाह पुढे आलेत. हे गुन्हे आयत्यावेळी प्रशासनाने रोखले असले तरी धोका अजूनही टळलेला नाही.

जिल्ह्याला बेरोजगारी आणि गरिबीचा बट्टा लागलेला आहे. त्यातच आता गुन्हेगारी, महिला अत्याचार हेही समाजस्वास्थ्याचे वैरी झालेत. अशाच साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मुलींना लवकर ‘उजवून’ जबाबदारीतून मोकळे होण्यासाठी गरीब पालकांची धडपड आहे. मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षे होण्यापूर्वी विवाह करण्यावर कायद्याने बंदी आहे. परंतु, ही बंदी झुगारण्याचे प्रकार अद्यापही सुरुच आहेत. जिल्हा बालसंरक्षण कक्ष, महिला बाल विकास विभाग, बाल कल्याण समितीने अगदी गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, सरपंच आदींना ॲक्टिव्ह केल्यामुळे बालविवाहांची खबर प्रशासनापर्यंत पोहचून हे अपराध हाणून पाडले जात आहेत. त्यातूनच गेल्या पाच वर्षात तब्बल १४७ बालविवाह प्रशासनाला रोखता आले. यंदा जानेवारी ते मे या पाचच महिन्यात तब्बल ३३ बालविवाह रोखण्यात आले. 

परंतु, जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता ज्यांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली नाही, अशा बालविवाहांची मोजदाद करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी कायद्याच्या धाकासोबतच तळागाळापर्यंत जनजागृती, राेजगाराची हमी, मुलींच्या सुरक्षेची हमी देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी जनभावना व्यक्त होत आहे. अन्यथा ‘ये कौन सा मोड हैं उम्र का...’ हे कुमारिकांचे भावविश्व उलगडणारे गाणे बदलत्या युगातही न बदलणाऱ्या सामाजिक स्थितीचा सवाल बनेल. प्रगतीकडे झेपावण्याची आस असलेल्या मुलींना अवेळी लग्नाच्या बेडीत अडकवले गेले तर त्या उद्या समाजधुरिणांना विचारतील, ‘हम आप के हैं कौन?’

बंदीला झाली शंभरी, तरी लोक ताळ्यावर येईना
भारतात सर्वप्रथम १९२९ मध्ये बालविवाह बंदीचा कायदा झाला. तेव्हा १४ वर्षाच्या वयापूर्वी मुलीचा आणि १८ वर्षापूर्वी मुलाचा विवाह गुन्हा ठरत होता. त्यात १९७८ मध्ये सुधारणा करुन मुलींसाठी लग्नाचे किमान वय १८ तर मुलांसाठी २१ वर्षे करण्यात आले. पुढे याच कायद्याला अतिशय कठोर स्वरुप देत २००६ चा बालविवाह प्रतिबंधक अधिनियम अस्तित्वात आला. म्हणजेच बालविवाहाच्या बंदीचा कायदा होऊन आता एक शतक झाले तरी आधुनिक काळातही अनेक लोक जाणतेअजाणतेपणी बालविवाहाला पाठबळ देताना दिसत आहेत.

मे महिन्यात सर्वाधिक
यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्यात तब्बल ३३ बालविवाहांच्या घटना उजेडात आल्या. त्यातील सर्वाधिक बालविवाहांचे घाट मे महिन्यात घातले गेले होते. १ मे रोजी एकाच दिवशी दोन बालविवाह उजेडात आले. अक्षय तृतियेचा मुहूर्त साधून अनेक विवाह लावले जातात. यंदा १० मे रोजीच्या अक्षयतृतियेला तब्बल पाच बालविवाह पकडण्यात आले. तर १७ मे रोजी पुन्हा सहा बालविवाह प्रशासनाने ऐनवेळी रोखले. तत्पूर्वी एप्रिलमध्येही एकाच मांडवात तब्बल पाच बालविवाह होताना आढळून आले. गेल्या पाच वर्षांचा विचार करता मे महिन्यात सर्वाधिक बालविवाहांच्या घटना पुढे आल्या आहेत.

लग्नाची पत्रिका पाहताच केला फोन...!
१ मे रोजी जिल्ह्यात दोन बालिकांचे लग्न लावून देण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यातील एका लग्नाच्या निमंत्रण पत्रिकाही अनेकांना वाटण्यात आल्या होत्या. परंतु, एका समंजस व्यक्तीला ही निमंत्रण पत्रिका मिळताच त्याने चाईल्ड लाईनवर फोन केला अन् हे दोन्ही बालविवाह रोखण्यात आले. अशीच सतर्कता समाजातील प्रत्येक व्यक्तीने बाळगून प्रशासनाला बालविवाहांची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आधी कुप्रथा मग गरिबी... आता मोबाईल ठरतोय कारणीभूत
स्वातंत्र्यपूर्व काळात बालविवाहांची कुप्रथा प्रचलित होती. नंतर कायद्याने, शिक्षणाच्या प्रसाराने ही कुप्रथा मागे पडत गेली. परंतु, गरिबीमुळे अजूनही अनेक पालक मुलींचे लग्न अल्पवयातच लावून देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आता तर अल्पवयीन मुला-मुलींच्या हाती आलेल्या मोबाईलने अन् त्यातील सोशल मीडियाने प्रश्नात नवी भर घातली आहे. अल्पवयात मोबाईलवर झालेली ओळख, त्यातून तथाकथित प्रेम अन् नाईलाजास्तव लग्न हे प्रकार वाढीस लागले आहेत.

पाच वर्षातील बालविवाहांचा धांडोळा
महिना/वर्ष : २०२० : २०२१ : २०२२ : २०२३ : २०२४
जानेवारी : ०० : ०१ : ०२ : ०१ : ०१
फेब्रुवारी : ०१ : ०१ : ०३ : ०५ : ०१
मार्च : ०२ : ०३ : ०१ : ०२ : ०३
एप्रिल : ०१ : ११ : ०७ : ०३ : १४
मे : ०२ : ०८ : १३ : ०७ : १४
जून : ०६ : ०३ : ०३ : ०५  
जुलै : ०३ : ०० : ०४ : ००  
ऑगस्ट : ०१ : ०२ : ०१ : ००  
सप्टेंबर : ०३ : ०० : ०० : ०० 
ऑक्टोबर : ०० : ०१ : ०१ : ००  
नोव्हेंबर : ०० : ०० : ०० : ०१  
डिसेंबर : ०० : ०३ : ०२ : ०२  
एकूण : १९ : ३२ : ३७ : २६ : ३३

Web Title: When girls are born at an unknown age In the last five years, one and a half hundred child marriages have been attempted, this year is the highest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.