वजन कमी-जास्त होते, केस गळतात, थायरॉईड तर नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 17:58 IST2025-02-19T17:57:43+5:302025-02-19T17:58:33+5:30
Yavatmal : लक्षणे दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

Weight gain or loss, hair loss, is it a thyroid disease?
संतोष कुंडकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : सद्यःस्थितीत प्रत्येकाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. सकस आहाराचा अभाव, व्यायामाकडे दुर्लक्ष, वाढती व्यसनाधीनता यामुळे कोणत्या ना कोणत्या आजाराची बाधा होत आहे. अलीकडे थायरॉइडचे प्रमाणही वाढले आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येते. मानवी शरीरात अनेक बदल घडत असतात.
या बदलाच्या प्रक्रियेत थायरॉइडच्या पेशी नष्ट होतात. त्यातूनच हा आजार वाढतो. यात दोन प्रकारचे थायरॉइड होतात. या दोन्हा प्रकारच्या थायरॉइडवर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात. या आजारावर उपचार असल्याने हा असाध्य आजार नाही. याचे वेळीच निदान व उपचार केल्यास निरोगी जीवन जगता येते. सतत वजन कमी होणे-वाढणे, अशी लक्षणे दिसताच, तपासणी करून उपचार घेणे, हे या आजारात महत्त्वाचे ठरते. या आजारावर वेळेवर उपचार सुरू केल्यास या आजारावर नियंत्रण ठेवता येते. हा आजार महिला व पुरुष अशा दोघांनाही होऊ शकतो. मात्र महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.
दहापैकी सात महिला थायरॉइड बाधित
थायरॉइड ही गळ्याच्या पुढच्या भागात स्थित फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. जी चयापचय, शारीरिक वाढ आणि ऊर्जेच्या पातळीसह शारीरिक कार्ये नियंत्रित करणारे संप्रेरक तयार करते. महिलांमध्ये थायरॉइडचे प्रमाण अधिक आहे. दहापैकी सात महिलांमध्ये साधारणतः थायरॉइड दिसून येतो.
थायरॉईडचे लक्षणे काय?
मंद हृदय गती, वजन वाढणे, बद्धकोष्ठता, नैराश्य, थकवा, कमकुवत केस आणि केस गळणे, कोरडी त्वचा, स्मरणशक्ती कमजोर होणे आणि अनियमित मासिक पाळी साधारणतः थायरॉइडची ही लक्षणे आहेत. वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.
अचानक वजन वाढणे-कमी होणे धोकादायक
विशेषतः वजन कमी होणे वाढणे हे थायरॉइड विकाराची लक्षणे असू शकतात. हायपोथायरॉइडिझम, हे एक अक्रियाशील थायरॉइड आहे. ज्यामुळे कमी कॅलरी सेवनाने देखील वजन वाढते. याउलट, हायपरथायरॉइडिझम हा एक अतिक्रियाशील थायरॉइड आहे. ज्यात मेटाबॉलिसम वाढते, परिणामी अनपेक्षित वजन कमी होते.
काय काळजी घ्याल?
- निरोगी अन्न खा, विशेषतः आयोडीनयुक्त सीफूड. धूम्रपान आणि अल्कोहोलयुक्त पेये टाळा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. तणावविरहित आयुष्य जगा.
- चरबी आणि कर्बोदके खाणे कमी करा. ताजी फळे आणि हिरव्या भाज्या जास्तीत जास्त खावी.
- आयोडिनयुक्त मीठ, मासे, कवच असलेले मासे, अंडी, दही आणि गायीच्या दुधाचा समावेश करावा.
थायरॉईडमुळे असा होवू शकतो रुग्णाला त्रास
थायरॉईड नोड्यूल्स असल्यास, रूग्णाचे अचानक वजन कमी होते, थकवा जाणवायला लागतो. तसेच स्नायू कमकुवत होतात, चिडचिड वाढते, कोरडी त्वचा, स्मृती समस्या, बद्धकोष्ठता, हृदयाचे ठोके अनियमित होतात. थायरॉईडची लक्षणे असलेल्या व्यक्तीमध्ये शरीरावर सूज येणे, त्वचा कोरडी पडणे, सहजतेने चरबी येणे, सहज थकवा आणि झोप येणे, थंडीची संवेदनशीलता वाढते
"थायरॉयइडचे प्रमाण वाढले आहे. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे लक्षणे दिसताच वेळीच तपासणी करून घ्यावे, डॉक्टरांनी दिलेला औषधोपचार नियमित घ्यावा, सुदढ आहाराचे सेवन करावे."
- डॉ. गणेश लिमये, वणी