लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पहाटे ५ वाजता बस येणार म्हणून पटापट आंघोळी उरकून, तयारी करून वऱ्हाडी मंडळी तयार झाली. सर्वांच्या नजरा रस्त्याकडे लागून होत्या. एकदाची बस नजरेत पडली. जागा पकडण्यासाठी साऱ्यांची धडपड सुरू झाली. गावात बस पोहोचल्याची वर्दी चालकाने लग्नघरी दिली. तोपर्यंत वऱ्हाड्यांनी जागा पकडून घेतली. तरीही अनेक प्रवासी शिल्लक होते. अखेर उलगडा झाला. पण सोपस्कार पूर्ण होईपर्यंत दोन तास निघून गेले.त्याचे असे झाले, सावर (ता.बाभूळगाव) येथील एका कुटुंबाने नागपूर येथे ९ मे रोजीच्या लग्न सोहळ्यासाठी दोन बसेसची नोंदणी केली होती. यासाठी आवश्यक तेवढ्या रकमेचा भरणा करण्यात आला. दोन बसच्या हिशेबाने सबंधितांना निरोप दिला. पण सकाळी एकच बस पोहोचली. विचारणा झाली तेव्हा एकच बस पाठविल्याचे सांगितले गेले. तेथून चौकशी सुरू झाली. बस बुकींगची नोंद घेणाऱ्या कर्मचाऱ्याने घातलेला घोळ पुढे आला. त्याने एकच बस बुकींगची नोंद घेतली होती.एनवेळी दुसरी बस पाठविण्याचा प्रयत्नात सावरमध्येच दोन तास निघून गेले. काही प्रवासी पुढे गेले तर काही उशिराने पोहोचले. एसटी कर्मचाऱ्याच्या दिरंगाईमुळे लग्नघरची मंडळी आणि वऱ्हाड्यांना त्रास सहन करावा लागला. प्रासंगिक करारासाठी घेतलेली बस निर्धारित वेळेपेक्षा विलंबाने पोहोचल्यास खोळंबा भत्ता वसूल केला जातो. आता महामंडळानेच बस दोन तास उशिराने पाठविली. अशावेळी काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
‘एसटी’च्या कारभाराचा लग्न वरातीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:35 IST