जिल्हा बँकेचे दोन अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST2022-05-08T05:00:00+5:302022-05-08T05:00:25+5:30

चिलगव्हाण सोसायटीत मृत शेतकऱ्यांच्या नावे कर्जाची उचल करण्यात आली होती. बँकेच्या निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत साधारणपणे एक कोटी रुपयांचे बनावट कर्ज वाटप झाल्याचे दिसून आले. त्यांच्या अहवालावरून यापूर्वी पाच अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले. मात्र, अहवालामधील इतर दोषींना काही संचालकांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तोंड पाहून कारवाई झाल्याने भेदभाव होत असल्याचा आरोप केला गेला.

Two District Bank officials suspended | जिल्हा बँकेचे दोन अधिकारी निलंबित

जिल्हा बँकेचे दोन अधिकारी निलंबित

लाेकमत न्यूज नेटवर्क
महागाव : यवतमाळ येथे शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मासिक सभेत महागाव तालुक्यातील हिवरा संगम शाखेतील आर्थिक घोटाळ्यावरून संचालकांमध्ये खडाजंगी उडाली. त्यानंतर दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा ठराव पारित केला आहे.
बैठकीत बँकेच्या अध्यक्षांच्या बाजूने बहुतांश संचालकांनी प्रतिसाद दिल्यामुळे अपहारातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे संचालक तोंडघशी पडले. अखेर  बँकेचे निरीक्षक आणि शाखा व्यवस्थापकांना निलंबित करण्यात आले. चिलगव्हाण सोसायटीतील आर्थिक घोटाळ्यातील निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता सात झाली आहे. निरीक्षक विष्णू आडे आणि तत्कालीन प्रभारी शाखा व्यवस्थापक अविनाश राठोड अशी शुक्रवारी निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत.
चिलगव्हाण सोसायटीत मृत शेतकऱ्यांच्या नावे कर्जाची उचल करण्यात आली होती. बँकेच्या निरीक्षकांनी केलेल्या तपासणीत साधारणपणे एक कोटी रुपयांचे बनावट कर्ज वाटप झाल्याचे दिसून आले. त्यांच्या अहवालावरून यापूर्वी पाच अधिकारी, कर्मचारी निलंबित झाले. मात्र, अहवालामधील इतर दोषींना काही संचालकांनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तोंड पाहून कारवाई झाल्याने भेदभाव होत असल्याचा आरोप केला गेला. त्यामुळे इतरांना वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्या संचालकाचे मनसुबे अन्य संचालकांनी उधळून लावले. 
अहवालानुसार दोषींवर सरसकट कारवाई करण्याऐवजी संचालकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून त्यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न इतर संचालकांच्या लक्षात आला. त्यामुळे अशी समिती कोणत्या अधिकारात नेमण्यात आली, संचालकांच्या म्हणण्यानुसार एखाद्याला क्लीन चिट देता येते का, असा प्रश्न बैठकीत उपस्थित झाला.  अखेरीस दोन अधिकाऱ्यांना निलंबित करून शासकीय विशेष लेखापरीक्षणानंतर फौजदारीचा निर्णय घेण्यात आला.

निरीक्षकावर सोपविली मोठी जबाबदारी
- २०१६-१७ मध्ये १३ लाख ८१ हजार ५०० रुपये नियमबाह्य कर्ज वाटप करण्यात आले. यातील निरीक्षक अशोक राठोड यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही. उलट त्यांना शाखा व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांना नेमके कोणते संचालक पाठीशी घालत आहेत, हे बँकेचे अध्यक्ष तपासणार का, असा प्रश्न आहे.

शुक्रवारच्या बैठकीत चिलगव्हाण सोसायटी प्रकरणातील निरीक्षक विष्णू आडे आणि प्रभारी शाखा व्यवस्थापक अविनाश राठोड यांना निलंबित करण्यात आले. विशेष लेखा परीक्षणानंतर फौजदारी दाखल करण्यात येईल. बँकेत घोटाळे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
- टिकाराम कोंगरे, अध्यक्ष, 
जिल्हा मध्यवर्ती बँक, यवतमाळ

 

Web Title: Two District Bank officials suspended

टॅग्स :bankबँक