अल्पवयीन बालकांविरोधात तब्बल ३९९ खटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 06:00 AM2020-03-06T06:00:00+5:302020-03-06T06:00:04+5:30

गुन्ह्यांसाठी लहान मुलांचा वापर केल्यास कायद्याच्या कचाट्यातून सहज सुटका होते. शिवाय आपले इप्सीतही साध्य करता येते. हाच फंडा हेरुन यवतमाळ शहरातील गुन्हेगारी टोळ्या सध्या काम करीत आहे. टोळीतील कुठलाच सदस्य पोलीस रेकॉर्डवर सक्रिय असल्याचे दिसत नाही. गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध गुन्हेगारी टोळीतील सदस्यांविरोधात वर्षभरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची संधीही पोलिसांना मिळत नाही.

A total of 399 cases against minors | अल्पवयीन बालकांविरोधात तब्बल ३९९ खटले

अल्पवयीन बालकांविरोधात तब्बल ३९९ खटले

Next
ठळक मुद्देबाल न्याय मंडळ : अल्पवयीनांचा गुन्ह्यांत वापर वाढला, वर्षभरात ३२ बालके सुधारगृहात दाखल

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : समाजातील अपप्रवृत्तींकडून कायम गुन्हेगारीला खतपाणी घातले जाते. त्यांच्यासाठी सर्वात सोईचे हत्यार म्हणजे अल्पवयीन मुले ठरतात. वर्षभरातील रेकॉर्डवर आलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकांचा आकडा हा थक्क करणारा आहे. बालसुधारगृहात एप्रिल २०१९ पासून फेब्रुवारी २०२० पर्यंत ३२ विधीसंघर्षग्रस्त बालक दाखल झाले आहेत. तर बाल न्यायमंडळाकडे विधीसंघर्षग्रस्त बालकांचे ३९९ खटले सुरू आहे. गुन्हेगार बालकांंचा वापर करीत असल्याने पोलिसांपुढेही नवे आव्हान निर्माण झाले आहे.
गुन्ह्यांसाठी लहान मुलांचा वापर केल्यास कायद्याच्या कचाट्यातून सहज सुटका होते. शिवाय आपले इप्सीतही साध्य करता येते. हाच फंडा हेरुन यवतमाळ शहरातील गुन्हेगारी टोळ्या सध्या काम करीत आहे. टोळीतील कुठलाच सदस्य पोलीस रेकॉर्डवर सक्रिय असल्याचे दिसत नाही. गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध गुन्हेगारी टोळीतील सदस्यांविरोधात वर्षभरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची संधीही पोलिसांना मिळत नाही. रेकॉर्डवर येत नसल्याने त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली, असे मुळीच नाही. उलट गुन्ह्याची पद्धत बदलवून ते अल्पवयीनांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून काम फत्ते करून घेत आहेत.
अल्पवयीन मुलांना प्रथम गांजा व इतर व्यसनांमध्ये गुंतवून त्यांना कुटुंबापासून विभक्त केले जाते. नंतर अशा बालकांचा सोईने वापर होतो. काहींना घरफोड्या व मालमत्तेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये वापरले जाते. तर गुन्हेगारी टोळ्या या शरीर दुखापतीच्या गुन्ह्यात, प्रतिस्पर्ध्याचा वचपा काढण्यासाठी या अल्पवयीनांचा वापर करतात. गुन्हेगारी टोळ्यांची ही नवीन कार्यशैली पोलिसांनाही ज्ञात आहे. मात्र कायदेशीर अडचणी, वरिष्ठांचे पुरेसे पाठबळ नसणे, टोळ्यांच्या म्होरक्यांना असलेला राजाश्रय अडसर ठरतो.
कुटुंबातून मिळणारे पाठबळ चिंताजनक
अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यात वापर झाल्यानंतर घसघशीत रक्कम हातात पडते. त्यामुळे काही पालकवर्गही चुप्पी साधून आहे. नुकत्याच एलसीबीच्या पथकाने उघड केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुले दोषी आढळून आली. मात्र वडिलांच्या चिथावणीवरूनच त्यांनी हे कृत्य केले. चोरीचा मुद्देमाल आल्यानंतर त्याचे रोखीत रुपांतर करण्यासाठी कुटुंबातून मदत मिळत असल्याचा गंभीर प्रकारही पुढे आला. त्यामुळे या बालकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

बालकांच्या काळजी व संरक्षणाकडे दुर्लक्ष
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत अल्पवयीन मुलांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी काळजी व संरक्षण समिती आहे. या समितीचे सचिव म्हणून जिल्हा कामगार अधिकारी काम करतात. मात्र ही समिती नावालाच असल्याचे दिसून येते. बालकांच्या काळजी व संरक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच विधीसंघर्षग्रस्त बालकांची संख्या वाढत आहे. याशिवाय अनेक सामाजिक समस्याही कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले जाते.


लोहारातील अल्पवयीनाने दिली २७ मोबाईल चोरीची कबुली आणि जप्तीही
लोहारा परिसरातील बायपासवरच्या चौकात राहणाºया एका अल्पवयीनाने सुरुवातीला २७ मोबाईल चोरीची कबुली दिली. इतकेच नव्हे तर ते मोबाईलही काढून दिले. त्यानंतर आता आठ दिवसापूर्वी दोन घरफोड्या केल्याचे कबूल करून २७ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांना काढून दिले. यावरून शहरात व जिल्ह्यातील विधीसंघर्ष ग्रस्त बालकांची समस्या किती उग्ररुप धारण करीत आहे, हे स्पष्ट होते.

अल्पवयीन मुले अंमली पदार्थांच्या आहारी, यवतमाळात रोज चार किलो गांजाची विक्री
यवतमाळ शहरातील भोसा व पांढरकवडा रोड परिसरातून दिवसाला तीन ते चार किलो गांजाची विक्री होते. सहज ५० रुपयात गांजाची पुडी उपलब्ध होते. अल्पवयीन मुले ही गांजाची पुडी घेऊन त्याचा नशा करीत आहे. अति गांजा सेवनामुळे चार महिन्यापूर्वी एका टोळीशी सलग्न असलेल्या अल्पवयीन बालकाचा मृत्यू झाला. गांजाचे सेवन केल्यानंतर ही अल्पवयीन मुले आक्रमक होतात. जामनकरनगर, विदर्भ हाऊसिंग परिसरात अल्पवयीनांमध्ये हिंसक घटनाही झाल्या आहे.

Web Title: A total of 399 cases against minors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.