आजचा विदर्भाचा लढा शेवटचा असेल

By Admin | Updated: April 24, 2016 02:35 IST2016-04-24T02:35:03+5:302016-04-24T02:35:03+5:30

स्वतंत्र विदर्भाचा लढा यापूर्वी दोन वेळा असफल झाला. आताचा लढा तिसरा आणि अंतिम असेल.

Today Vidarbha's fight will be the last | आजचा विदर्भाचा लढा शेवटचा असेल

आजचा विदर्भाचा लढा शेवटचा असेल

श्रीहरी अणे : यवतमाळ येथे जाहीर व्याख्यान
यवतमाळ : स्वतंत्र विदर्भाचा लढा यापूर्वी दोन वेळा असफल झाला. आताचा लढा तिसरा आणि अंतिम असेल. येत्या तीन वर्षात विदर्भ वेगळा झाला नाही, तर पुढील २५ वर्षातही होणार नाही. केंद्रात भाजपाचे बहुमत असेपर्यंतच वेगळा विदर्भ होणे आवश्यक आहे. १ जानेवारी २०१७ पर्यंत याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल, असे प्रतिपादन माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले. येथील लोकनायक बापूजी अणे विद्यालयात त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार जांबुवंतराव धोटे होते.
श्रीहरी अणे पुढे म्हणाले, विदर्भाबाबत हेतुपुरस्सर चार गैरसमज पसरविले जातात. विदर्भाची मागणी ही जनतेची नाही, विदर्भाचे नेते कमजोर आहेत, वेगळा विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही आणि मराठी माणूस संपून हिंदी भाषिकांचे वर्चस्व निर्माण होईल. खरे म्हणजे जनमत नाही, हे धादांत खोटे आहे. विदर्भ सी.पी. अ‍ॅन्ड बेरार असेंब्लीत असतानाच वेगळ्या विदर्भाचा ठराव १९३८ मध्ये झाला आहे. मुंबई राज्यात विदर्भ सामील करतानाच नागपूर आणि अकोला येथे करार झाले आहेत ते विदर्भाचे वेगळेपण जोपासणारे करार होते. मुंबई राज्य निर्मितीच्या वेळीच पंडित नेहरुंनी वेगळ्या विदर्भाचा पुरस्कार केलेला आहे. नागपूर आणि मद्रास येथील काँग्रेसच्या अधिवेशनातही ठराव झाले आहेत. फाजलअली कमिशनने १९५६ ला वेगळा विदर्भ व्हावा, असे म्हटले आहे. लोकनायक बापूजी अणे यांची कैफियत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही एका भाषेची अनेक राज्ये होऊ शकतात असे म्हटले आहे. मुंबई राज्यातून गुजरात वेगळा झाला तेव्हाच विदर्भातील ११७ आमदारांनी वेगळ्या विदर्भासाठी राजीनामे देण्याची तयारी दाखविली होती. परंतु यशवंतराव चव्हाणांनी विकासाची ग्वाही देऊन विदर्भाला वेगळे होऊ दिले नाही. जनमत नाही असे शासनाला वाटत असले तर जनमताचा कौल घ्यावा. त्यामध्ये ५१ टक्के लोकांनी मागणी केली नाही तर आम्ही विदर्भाची मागणी सोडून देऊ. एखाद्या राज्याची निर्मिती हा केंद्र शासनाचा विषय आहे. त्यासाठी महाराष्ट्रात ठराव पारित करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानाहून जांबुवंतराव धोटे म्हणाले, आज मूल्यहिन राजकारणाचा कळस झाला आहे. मूल्ये हरविलेल्यांची पिलावळ पश्चिम महाराष्ट्रात वाढली आहे. खरे बोलणाऱ्या माणसाला आज गुन्हेगार ठरविले जात आहे. विदर्भाचे राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
अ‍ॅड. विजयाताई धोटे यांचेही मनोगत झाले. विदर्भ हा जिजामाता, रुक्मिणी, राष्ट्रसंत, गाडगे महाराजांचा असून यवतमाळ हे विदर्भाच्या संघर्षाचे केंद्र आहे. प्रास्ताविक माजी आमदार दिवाकर पांडे यांनी केले. विचारपीठावर अ‍ॅड. रवी संन्याल, चंद्रकांत रानडे, वासुदेव विधाते, अ‍ॅड. उदय पांडे, नीरज खांदेवाले, मोहन जोशी आदी उपस्थित होते. संचालन श्याम मंचलवार, आभार अ‍ॅड. विजय बोरखडे यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)

महाराष्ट्रदिनी विदर्भ झेंडा
१ मे महाराष्ट्र निर्मितीचा दिवस आमच्यासाठी काळा दिवस ठरला आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण विदर्भात विदर्भ झेंड्याचे ध्वजारोहण केले जाणार आहे. भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यातील वेगळ्या विदर्भाचे वचन पूर्ण केले नाही. त्यामुळे याचदिवशी निवडणूक जाहीरनाम्याची होळी करणार असल्याचे ते म्हणाले. ज्या जिल्ह्याने लोकनायक बाबूजी अणे दिले, विदर्भवीर जांबुवंतराव दिले त्याच जिल्ह्याने आम्हाला वेगळा विदर्भ मिळवून दिला पाहिजे, असे भावनिक आवाहन अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी यावेळी केले.

Web Title: Today Vidarbha's fight will be the last

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.