सीमावर्ती तीन गावांचा तिढा अद्याप कायमच
By Admin | Updated: May 10, 2015 01:57 IST2015-05-10T01:57:38+5:302015-05-10T01:57:38+5:30
मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांचा तिढा अद्याप कायमच आहे.

सीमावर्ती तीन गावांचा तिढा अद्याप कायमच
मारेगाव : मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यातील उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांचा तिढा अद्याप कायमच आहे. या तीनही गावांचा विकास रखडला आहे. पंचायत समिती आणि तालुका या वादात ही गावे भरडली जात आहे.
वणी तालुक्याच्या विभाजनानंतर मारेगाव तालुका अस्तित्वात आला. कालांतराने मारेगाव तालुक्याचे विभाजन होऊन झरीजामणी तालुका निर्माण झाला. झरी, मारेगाव येथे स्वतंत्र पंचायत समितीही अस्तित्वात आली. मात्र ही तीन गावे तालुका आणि पंचायत समितीच्या कलहात भरडली जात आहे. मारेगाव तालुक्याचे १९९२ मध्ये विभाजन होऊन झरीजामणी तालुका निर्माण झाला. या विभाजनात उमरघाट व पेंढरी ही दोन गावे मारेगाव तालुक्यात, तर आंबेझरी हे गाव झरी तालुक्यात गेले.
प्रथम मारेगाव व झरी या दोन्ही तालुक्यांसाठी मारेगाव ही एकच पंचायत समिती होती. एकच पंचायत समिती असल्याने सुरूवातीला या तीनही गावांची कोणतीही अडचण नव्हती. तथापि पाच वर्षांनंतर मारेगाव पंचायत समितीचे विभाजन होऊन झरी पंचायत समिती निर्माण झाली अन् या तीन गावांची रडकथा सुरू झाली. त्यात उमरघाट, पेंढरी आणि आंबेझरी या तीन गावांची कोंडी झाली. स्वतंत्र पंचायत समितीनंतर त्यांच्या विकासात खोडा निर्माण झाला.
पंचायत समिती विभाजनात मारेगाव तालुक्यातील उमरघाट आणि पेंढरी गावांना झरी पंचायत समितीमधील सुर्ला आणि सुसरी ग्रामपंचायतीमध्ये ठेवण्यात आले, तर झरीजामणी तालुक्यातील आंबेझरी गावाला मारेगाव पंचायत समितीमधील सगनापूर ग्रामपंचायतीला जोडण्यात आले. त्यामुळे या गावांचा विकासच रखडला. ग्रामस्थांना विविध त्रास होऊ लागला. दोन तालुके आणि दोन पंचायत समितीमुळे ही गावे चांगलीच संकटात सापडली.
प्रत्येक निवडणुकीत पक्षीय पदाधिकारी, उमेदवार या गावांत जातात. ग्रामस्थांना तिढा सोडविण्याची ग्वाही देतात. मात्र निवडणुकीनंतर त्यांना या गावांचा विसर पडतो. लोकप्रतिनिधींच्या या उदासीन वृत्तीमुळे आता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळत आहे़ तेथील ग्रामस्थांना कोणत्या तहसीलकडे आणि कोणत्या पंचायत समितीकडे दाद मागावी, असा प्रश्न पडला आहे. या गावांसाठी दरवर्षी विकास निधी येतो. तो पंचायत समितीत जमा होतो. मात्र दोन पंचायत समित्या असल्याने दोनही पंचायत समित्यांना विकास निधी दरवर्षी परस्परांना वळता करावा लागतो़ त्याला विलंब होतो. संबंधित ग्रामपंचायतीही सापत्न वागणूक देतात. त्यामुळे या तीन गावांतील विकास रखडला. (तालुका प्रतिनिधी)