कायदा, सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलिस पाटलांची जिल्ह्यातील ३३६ पदे रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 18:01 IST2024-12-10T18:00:00+5:302024-12-10T18:01:57+5:30
एका पोलिस पाटलाकडे चार गावांचा पदभार : वयोमर्यादा वाढविण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष

There are 336 vacant posts in the district of police stations which are responsible for law and order
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गावाची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिस पाटलाची आहे. असे असतानी जिल्ह्यातील पोलिस पाटलांची ३३६ पदे रिक्त आहेत. यामुळे एकाच पोलिस पाटलाकडे तीन ते चार गावांची जबाबदारी आहे. यातून संपूर्ण व्यवस्था सांभाळताना पोलिस पाटलांची चांगलीच तारांबळ उडत आहे. रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी पोलिस पाटील संघटनेने केली आहे.
जिल्ह्यात दीड हजार पोलिस पाटलांची पदे आहेत. त्यापैकी ११३४ पदे भरलेली आहेत. उर्वरित ३३६ पदांवर अजूनही पोलिस पाटील नियुक्त नाही. याउलट गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पोलिस पाटलांवर कामाचा ताणही वाढला आहे.
गौण खनिज चोरीच्या घटना, अवैध रेती उपसा, गावातील अवैध धंदे, अदखलपात्र गुन्हे आणि कौटुंबिक कलह यांसारख्या अनेक बाबींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिस पाटलांकडे आहे. पोलिस पाटील हे गावाच्या सुरक्षेचे महत्त्वाचे पद आहे. असे असतानाही पोलिस पाटलांची अनेक पदे जिल्ह्यात रिक्त आहेत.
जिल्ह्यातील ११३४ पोलिस पाटलांवर २०४० गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. २७ लाख लोकसंख्येत ग्रामीण भागातील लोकसंख्या पाहता या ठिकाणी ११३४ पोलिस पाटील अपुरे आहेत. प्रत्येक गावाला किमान एक पोलिस पाटील गरजेचा आहे. निर्धारित मनुष्यबळानुसार जिल्ह्यात ३३६ पोलिस पाटलांची पदे अजून रिक्त आहेत. एकाच पोलिस पाटलाकडे मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळताना तारेवरची कसरत होते. गावपातळीवरील प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस पाटील पद भरणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पावले उचलावीत म्हणून आता पोलिस पाटील संघटना आग्रही आहे. गत अनेक वर्षांपासून पोलिस पाटलांचे प्रश्न कायम आहेत. या प्रश्नाकडे संघटनेकडून वारंवार पाठपुरावा केला जातो. या प्रश्नाची सोडवणूक झाली तर गावपातळीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासह अनेक प्रश्न निकाली निघतील. याशिवाय प्रत्येक ठिकाणी शांतता अबाधित राहण्यास मदत होईल.
तब्बल १२ वर्षापासून प्रवास भत्ताच नाही
पोलिस पाटलांना बैठका आणि पोलिस ठाण्यातील कामासह इतर गावांचा पदभार सांभाळावा लागतो. यातून पोलिस पाटील सतत फिरत असतात. यात त्यांचा खिसाच रिकाम होतो. यामुळे प्रलंबित प्रवास भत्ता मिळावा आणि पोलिस पाटील यांना महागाई भत्ता लागू करावा, अशी मागणी आहे.
पोलिस पाटलांचे निवृत्ती वय वाढवा
पोलिस पाटलांचे निवृत्तीचे वय ६० वर्षांवरून ६५ वर्षे करण्यात यावे, या मागणीसाठी संघटना पाच वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. मात्र, अजूनही विषय निकाली निघाला नाही. यामुळे अनेक ठिकाणी पोलिस पाटलांची पदे रिक्त झाल्यावर भरती रखडली आहे.
"पोलिस पाटलांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, निवृत्तीचे वय वाढविण्यात यावे आणि प्रलंबित प्रवास भत्ता द्यावा, यासाठी पोलिस पाटील आग्रही आहेत. एका पोलिस पाटलाकडे दोन किंवा तीन गावांचा पदभार आहे. अशावेळी सर्व ठिकाणची जबाबदारी सांभाळताना त्यांची तारेवरची कसरत होते. यातून रिक्त पदे भरण्याची मागणी आहे."
- रवीन्द्र राऊत, अध्यक्ष, पोलिस पाटील संघटना