विशाल सोनटक्के लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यात जोपर्यंत तातडीने वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत जिल्ह्यात नवे उद्योग येणार नाहीत, येथील तरुणांना कामासाठी वणवण फिरावे लागणार आहे. त्यामुळे या रेल्वे कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग यावेत यासाठी अनंत अंबानीसह इतर उद्योजकांशी बोलून यवतमाळकरांना मदत करावी, अशी विनंती लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य डॉ. विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता रिलायन्सच्या माध्यमातून जपानची कंपनी यवतमाळमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. दर्डा यांनी वर्षा बंगल्यावर सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. या प्रसंगी लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषी दर्डा उपस्थित होते. दावोस येथील परिषदेत महाराष्ट्राने मोठी गुंतवणूक मिळविली. याबद्दल डॉ. दर्डा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले. या गुंतवणुकीमुळे संबंधित जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळेलच. सोबत हजारो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात औद्योगिकरणाला गती मिळत आहे. छत्रपतीसंभाजीनगर येथील ऑरिक सिटीत सज्जन जिंदल यांच्या जेएसडब्ल्यू समूहाच्या वतीने इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा प्रकल्प सुरू होत आहे. यासाठी २७ हजार २०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
कॉटन सिटी यवतमाळमध्ये बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. काटोल (नागपूर) येथे जसे कृषी आधारित उद्योग येत आहेत. त्यातून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होईल त्याचप्रमाणे यवतमाळ येथे कापूस उत्पादनाला चालना देण्यासाठी गारमेंट उद्योग उभारण्याची गरज डॉ. दर्डा यांनी व्यक्त केली. दुर्गम गडचिरोलीच्या विकासाला चालना मिळते आहे. स्टीलवर आधारित उद्योगापाठोपाठ विविध पूरक उद्योगही येत आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत होणारे विमानतळही नागपूरसारखेच उभारू, असे मुख्यमंत्री म्हणाले.
विमानतळांचे अपग्रेडेशन करु, डॉ. विजय दर्डा यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांचा शब्द
यवतमाळसह राज्यातील सर्व विमानतळे आधुनिक करावी, विमान वाहतुकीचा राज्याचा रोड मॅप तयार करून आवश्यक तिथे धावपट्टी वाढवावी अनेक ठिकाणी रात्रीच्या लँडिंगच्या अडचणीत आहेत. रनवेची लांबी, मजबुती आणि ड्रेनेज सिस्टीम सुधारून इन्ट्रूमेंट लँडिंग सिस्टीम बसवायला हवी. आधुनिक एटीसी रडार व कम्युनिकेशन सिस्टीमसह उपग्रह आधारित नेव्हीगेशनचा (जीएनएसएस) वापर वाढविण्याची गरज दर्डा यांनी व्यक्त केली. आज आम्ही राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विमान अपघातात गमावले आहे. त्यामुळे विमानतळ सुरक्षेच्या दृष्टिने आवश्यक ते सर्व निर्णय तातडीने घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गाला गती देण्यासाठी रेल्वे मंत्र्यांशी बोलणार
वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किमी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. मात्र २००९ मध्ये भूमिपूजन झालेला हा मार्ग कळंबपर्यंत (५० किमी) पूर्ण होण्यास २०२४ उजाडले. त्यापुढील कामेही अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. विशेषत: नांदेडकडील कामे अनेक ठिकाणी अद्यापही सुरू झालेली नाहीत. अशा स्थितीत रेल्वेच्या नियोजनानुसार पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी वाटते. त्यामुळे या कामाला गती देण्याची मागणी डॉ. विजय दर्डा यांनी केली असता या अनुषंगाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यवतमाळ जिल्हा बँकेतील व्यवहारांची चौकशी लावावी
डॉ. दर्डा यांनी यावेळी यवतमाळ जिल्हा बँकेतील गैरप्रकार थांबले पाहिजेत, यासाठी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासोबत चर्चा करून बँकेच्या सर्व व्यवहारांची चौकशी लावावी, अशी मागणी केली. बँकेचा वाढलेला एनपीए चिंताजनक आहे. शेतकऱ्यांची बँक वाचली पाहिजे, अशी भूमिका मांडली.
यवतमाळमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुधारण्याची आवश्यकता आहे. हे काम अधिक सक्तीने व्हावे. यवतमाळ नगरपरिषदेतील साफसफाईचे टेंडर केवळ कागदोपत्री मोठ्या एजन्सीकडे जाते. मात्र, पोट कंत्राटदारांकडूनच कामे केली जात असल्याने दरवर्षी मोठी रक्कम खर्चूनही नागरिकांना स्वच्छतेच्या अनुषंगाने फारसा उपयोग होत नसल्याकडे लक्ष वेधले असता या सर्व प्रश्नांवर ठोस कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी डॉ. दर्डा यांनी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, चंद्रपूरचे पालकमंत्री प्रा.डॉ. अशोक उईके, आमदार बाळासाहेब मांगूळकर यांच्यासह इतर आमदारांसोबत चर्चेसाठी वेळ देण्याची विनंती केली असता लवकरच आपण एकत्रित बैठक घेवू असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिला.
Web Summary : Chief Minister assures speeding up Wardha-Yavatmal-Nanded railway. He considers attracting industries to Yavatmal, addressing unemployment. Focus on airport upgrades, Yavatmal district bank issues and law enforcement improvements were also discussed.
Web Summary : मुख्यमंत्री ने वर्धा-यवतमाल-नांदेड रेल मार्ग को गति देने का आश्वासन दिया। उन्होंने यवतमाल में उद्योगों को आकर्षित करने, बेरोजगारी को दूर करने पर विचार किया। हवाई अड्डे के उन्नयन, यवतमाल जिला बैंक के मुद्दों और कानून व्यवस्था में सुधार पर भी चर्चा हुई।